
देवरुख ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व्हावे
देवरुख ग्रामीण रुग्णालय
उपजिल्हा रुग्णालय व्हावे
निखिल कोळवणकर ः क्रांती व्यापारी संघटला पुढाकार घेणार
साडवली, ता. ३१ : देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरणचे काम अंतिम टप्प्यात आहे. ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी अपुऱ्या असतात. आवश्यक सुविधांची कमतरता नवीन इमारतीतही भासणार आहे. त्यामुळे नुसती इमारत नवीन असण्यापेक्षा दूरदृष्टी ठेऊन उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी केले. संघटनेतर्फे तसे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. देवरुख व संगमेश्वर येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रूग्णालयात रुपांतर करण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच तालुक्याच्या शेखर निकम,राजन साळवी व मंत्री उदय सामंत यांनी देवरुख हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा करावा असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
नूतन इमारतीत अद्यावत सुविधा जसे की अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस, रक्तपेढी, सारखे विभाग चालू करता येणे शक्य होणार आहे. याकरिता क्रांती व्यापारी संघटना भारत सरकारकडे, केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्यमंत्री, खासदार यांच्यामार्फत तसेच महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री तालुक्याचे तीन आमदार, यांच्याद्वारे मागणी करणार आहेत. प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सचिव, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक, आरोग्य अधीक्षक यानाही निवेदने दिली जाणार आहेत. माजी राज्यमंत्री, माजी आमदार तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त विविध सामाजिक संस्था धर्मदाय संस्था ग्रामस्थ मंडळे क्रीडा मंडळे यांची शिफारस पत्रे निवेदनासोबत जोडली जाणार आहेत. रुग्णांची होणारी परवड थांबवण्यासाठी देवरुख येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी वर्षानुवर्ष होत आहे. आता क्रांती व्यापारी संघटना यात पुढाकार घेत आहे. याला तालुकावासियांनी पाठींबा दिला तरच रुग्णांची सेवा चांगली होणार आहे.