
इएसआय रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू
इएसआय रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू
पालकमंत्री सामंतांचा पाठपुरावा ; कंत्राटी कामगारांना मोफत आरोग्य सेवा
चिपळूण, ता. ३१ ः कर्मचारी राज्य विमा महामंडळाची सामाजिक सुरक्षा योजना (इएसआय) रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये मोफत आरोग्यसेवेचा लाभ जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. योजनेचा प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला.
अल्पउत्पन्न वर्गातील कर्मचारी व कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्रशासनाच्या इ. एस. आय योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधेची तरतुद केली जाते. यामध्ये महिन्याला २१ हजार रुपयांपेक्षा कमी वेतनश्रेणीतील कामगारांसाठी इ एस आय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येतात. कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांसाठीही या योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. राज्यातील गडचिरोली, हिंगोली, नंदुरबार वाशीम सह रत्नागिरी जिल्ह्यात ईएसआय योजनेची अंमलबजावणी झालेली नव्हती.
रायगड जिल्हा या योजनेसाठी २०१६ साली पात्र ठरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही एप्रिल २०१९ पासून मर्यादित स्वरूपात ही योजना लागू झाली. मात्र पुरेसा पाठपुरावा न झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कामगार या सेवेपासुन वंचित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कामगारांसाठी ईएसआय योजना लागू होण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करणारे खडपोली (चिपळूण) येथील अभियंता व स्थानिक कामगारांचे कल्याणासाठी झटणारे तुषार शिंदे यांनी निवेदन देऊन पालकमंत्री उदय सामंत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.
रत्नागिरी, लोटे, खेर्डी, खडपोली येथे हजारो कामगार कंत्राटी पद्धतीने किमान वेतनश्रेणीवर अनेक वर्षे काम करत आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या योजनेची सर्वाधिक गरज आहे, हे ओळखुन सामंत यांनी पाठपुरावा केला. मंत्री सामंत यांनी इएसआय बोर्डाच्या दिल्लीतील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे बोर्डाच्या २४ जानेवारी २०२३ चे अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२३ पासून ईसआय योजना लागू होत आहे.
जिल्ह्यासाठी शाखाही मंजूर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कर्मचार्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हयातील हजारो कर्मचारी व कामगारांच्या हिताच्या आरोग्य सेवेसारख्या संवेदनशील विषयाचा पाठपुरावा करून अतिशय अल्पकालावधीत योजना लागू करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, एमआयडीसीचे अधिकारी चंद्रशेखर खडतरे यांचे उद्योजक तसेच कामगार वर्गाकडून आभार व्यक्त केले जात आहेत.
---
कोट
इएसआय योजनेच्या अंमलबजावणीमुळे किमान वेतनावर काम करणारे कामगार व त्यांचे कुटुंबिय यांना कोणत्याही सामान्य अथवा दुर्धर आजारावर मोफत आरोग्यसेवा मिळेल. यासाठी पात्र असणार्या सर्व कर्मचार्यांनी ईएसआय नोंदणी करण्यासाठी आपली आस्थापना अथवा कंत्राटदार यांच्याकडे पाठपुरावा करुन योजनेचा लाभ घ्यावा.
- तुषार शिंदे, खडपोली