
रत्नागिरी ः राज्यस्तरीय काजू परिषद 11, 12 ला रत्नागिरीत
राज्यस्तरीय काजू महोत्सव ११पासून रत्नागिरीत
विवेक बारगीर ; लागवड, मार्केटिंगचे मार्गदर्शन, प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.३ ः रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघाच्या माध्यमातून ११ आणि १२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी लागवडीसह मार्केटिंगवर मार्गदर्शनासह अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे काजू प्रक्रियाधारक संघाचे जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर यांनी सांगितले.
काजू क्षेत्रातील समस्या विचारात घेऊन डिसेंबर २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेत महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाधारकांचा विचार करून स्वतंत्र मदतीचा १ हजार १७५ कोटीचा निधी देत उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत यांनी विशेष सहकार्य केले. काजू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. एमआयडीसीतील दळवी काजू प्रक्रिया प्रकल्प येथे होणाऱ्या काजू महोत्सवाला ११ फेब्रुवारीला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी खासदार नीलेश राणे उपस्थित राहणार आहेत. १२ फेब्रुवारीला विधान परिषद आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, उद्योगपती किरण सामंत हे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणार्या या परिषदेला राज्यातून अनेक शेतकरी, काजू व्यावसायिक, काजू व्यापारी, यंत्रसामग्री तयार करणारे कारखानदार उपस्थित राहणार आहेत.
गेली पाच वर्षे, काजू प्रक्रियाधारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्याकरिता प्रयत्न करत आहेत. मधल्या काळात २०१७ मध्ये दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली केसरकर समिती अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये अनेक योजना तयार करून अहवाल तयार करण्यात आला. काजू कारखानदारांच्या थकित कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समिती अहवालाची अंमलबजावणी व्हावी, नियमित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकांना बँकेच्या जाचक अटींमधून मुक्तता मिळावी, पणन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून काजू बी चे संकलन व्हावे, अशा विविध मागण्या मांडून संघटनेच्या पदाधिकार्यांनी वेळोवेळी सरकार दरबारी मांडले होते. त्याला यश आले आहे. याबद्दल काजू व्यापार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.