
घरबसल्या रोजगार देतो असे सांगून महिलांची फसवणूक
rat0426.txt
(पान 3 साठी)
रोजगार देण्याचे आमिषाने महिलांची फसवणूक
गुहागरातील प्रकार ; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
गुहागर, ता. 4 ः घरबसल्या सॅनिटरी पॅड, डिटर्जंट पावडर बनवून देण्याचे रोजगार मिळून देतो असे सांगून जिल्ह्यातील महिलांकडून सभासद फी, कच्चा मालासाठी ७२ हजार ६०१ रूपयांची फसवणूक केल्याचा एकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संदीप शरद मुळे (पाटील) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की 10 जून 2022 ला गरज फाउंडेशन या नावाने संशयित संदीप मुळे याने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्याआधारे जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो, असे सांगितले. महिलांचे तालुकापातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले. या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांचे सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. सुरवातीचे काही महिने लवकरच कच्चामाल पाठवून देतो, असे सांगत चालढकल केली. काही महिलांनी याबाबत ग्रुपवर विचारणा केली त्यावेळी संदीप मुळे (पाटील) याने धमकी दिली. तसेच महिलांशी अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी गुहागर पोलिस ठाण्यात धाव घेतली. अशाप्रकारे 151 महिलांकडून सभासद फी 351 रुपये त्याप्रमाणे 53001 रु. तसेच कच्चा माल व मशीन यासाठी 1 9 हजार 600 रुपये अशी एकूण 72 हजार 601 रुपयांचे फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. त्यानुसार संशयित मुळेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
--