
वाचन, चिंतनातून प्रगल्भतेत वाढ
80457
बांदा ः गोगटे-वाळके महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन करताना उद्योजिका विशाखा शेडगावकर. शेजारी इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
वाचन, चिंतनातून प्रगल्भतेत वाढ
प्रा. प्रवीण बांदेकर ः बांद्यात पारितोषिक वितरण उत्साहात
बांदा, ता. ४ ः बदलत्या काळाचे संदर्भ ओळखून आताच्या पिढीने सजग राहायला हवे. वाचन, चिंतनातून आपली वैचारिक प्रकल्भता वाढवावी. यासाठी ग्रंथांचा आधार घ्यावा. तरुण पिढीची खरी जडणघडण महाविद्यालयीन कालखंडात होत असते. या कालखंडात स्वतःला सिद्ध करता येते. महाविद्यालयीन कालखंडातील संस्कार जीवनाला आकार देतात. त्यामुळे या कालखंडाचा सन्मान करायला शिका, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथे केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रा. बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव एस. आर. सावंत, खजिनदार टी. एन. शेटकर, डेगवे सरपंच श्री. देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. डी. कार्वेकर, जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक एस. बी. शिरोडकर, प्रा. निरंजन आरोंदेकर आदी उपस्थित होते. डॉ. काजरेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कार्वेकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
यावेळी चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पीएचडी पदवी संपादन केले प्रा. डॉ. ए. पी. महाले, एमफील पदवी संपादन केलेले प्रा. यू. टी. परब, विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले प्रा. निरंजन आरोंदेकर व नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रा. दर्शना शिरोडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी वारंग यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा. बांदेकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चालू शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयात आदर्श विद्यार्थी म्हणून ऋतिक धुरी (तृतीय वर्ष वाणिज्य) व आदर्श विद्यार्थिनी म्हणून श्रद्धा हेवाळकर (तृतीय वर्ष कला), आदर्श स्वयंसेवक एनएसएस पुंडलिक घाडी (प्रथम वर्ष कला), आदर्श स्वयंसेविका मेघना गोरे, आदर्श एनसीसी कॅडेट गुरुप्रसाद गडकरी, आदर्श एनसीसी कॅडेट मुलींमधून चैताली देसाई (तृतीय वर्ष वाणिज्य), आदर्श अष्टपैलू खेळाडू विनया गवस (तृतीय वर्ष वाणिज्य), अष्टपैलू खेळाडू पुरुष ओंकार देसाई (प्रथम वर्ष वाणिज्य), डीएलएलई सर्वोत्कृष्ट विद्यार्थी देवांग गवस (तृतीय वर्ष वाणिज्य) आदी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. जनरल चॅम्पियनशिप वर्ग व आदर्श वर्ग आदी सन्मान देऊन त्या त्या वर्गाला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. आभार प्रा. अनिल शिर्के यांनी मानले. सायंकाळच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला ''रंगाविष्कार'' हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा येथील प्रसिद्ध उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या विशाखा शेडगावकर यांच्या हस्ते झाले.
--
अभिमानास्पद कामगिरी करा
यावेळी वारंग म्हणाले, ‘‘डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या संकल्पनेतून या महाविद्यालयाची निर्मिती झाली. या महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा सार्थ अभिमान वाटेल, अशी कामगिरी करावी. हे महाविद्यालय समाजाभिमुख होत आहे. अनेक उपक्रमांतून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत असून याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या संधी ओळखाव्यात व तेथे तशी यशस्वी कामगिरी करावी. आयएएस झालेला अधिकारी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून घडावा, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा.’’