पान एक-सिंधुदुर्गात शिक्षकांच्या 1 हजार जागा भरणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सिंधुदुर्गात शिक्षकांच्या 1 हजार जागा भरणार?
पान एक-सिंधुदुर्गात शिक्षकांच्या 1 हजार जागा भरणार?

पान एक-सिंधुदुर्गात शिक्षकांच्या 1 हजार जागा भरणार?

sakal_logo
By

सिंधुदुर्गात शिक्षकांच्या
एक हजार जागा भरणार?
प्रक्रिया सुरू ः अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षकांच्या आणि खासगी व्यवस्थापनातील शाळांतील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त ६४३, तर जिल्ह्याबाहेर बदली होऊन जाणाऱ्या शिक्षकांची संख्या ४५९ एवढी आहे. त्यामुळे या बदलीत जिल्ह्याला एक हजार १०२ शिक्षक मिळण्याची आवश्यकता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षक नसल्याने अनेक गावांतील पालक आंदोलने करीत आहेत. शिक्षक मिळावा, यासाठी शाळा बंद आंदोलने सुद्धा जिल्ह्यात केली आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापन असलेल्या शाळा यांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ ही परीक्षा जाहीर झाली आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२२ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. ८ फेब्रुवारीपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेची पूर्व तयारी सुरू केल्यावर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षक पदांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ११०२ पदे रिक्त असल्याचे निश्चित झाले आहे. भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत यात काहीसा बदल होऊ शकतो. या ११०२ रिक्त पदांत जिल्ह्याबाहेर बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. तब्बल ४५९ एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात बदली झालेले आहेत. या संभाव्य रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या हजारांच्या वर पोहोचणार आहे.
जिल्ह्यात सध्या मंजूर उपशिक्षक पदांपैकी ३०६ पदे रिक्त आहेत. मंजूर पदवीधर शिक्षक या पदांपैकी ३३७ पदवीधर शिक्षक पदे रिक्त आहेत. एकूण ६४३ शिक्षक पदे रिक्त आहेत. शासनाच्या जिल्ह्याबाहेरील बदली नियमानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांतील ४५९ शिक्षकांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे. केवळ त्यांना पर्यायी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना कार्यमुक्त केलेले नाही; परंतु अशाप्रकारे जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश शासन स्तरावरून निघत आहेत. एवढ्या संख्येने शिक्षक कार्यमुक्त केले, तर त्या तुलनेत दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती शासनाने थेट भरतीत करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
------------
चौकट
...तरच वाद थांबेल
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार आहेत. त्यांना आंतरजिल्हा बदली प्रकारामुळे जिल्ह्यातील शिक्षणावर होणारा परिणाम ज्ञात आहे. ४५९ शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले आणि त्या बदल्यात शिक्षक मिळाले नाहीत, तर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था कोलमडून जाईल. दुसऱ्या जिल्ह्यातून एवढे शिक्षक बदली प्रक्रियेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणे अवघड आहे. त्यामुळे संभाव्य शिक्षक भरती प्रक्रियेत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या संख्येएवढे शिक्षक या जिल्ह्यात संभाव्य रिक्त होणाऱ्या जागा म्हणून मिळाव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक संघटना व राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जात आहे. तसे झाले तरच गेली अनेक वर्षे आंतरजिल्हा बदलीचा सुरू असलेला वाद थांबू शकतो.