साडेतीन वर्षानंतरही भरपाई मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेतीन वर्षानंतरही भरपाई मिळेना
साडेतीन वर्षानंतरही भरपाई मिळेना

साडेतीन वर्षानंतरही भरपाई मिळेना

sakal_logo
By

साडेतीन वर्षानंतरही भरपाई मिळेना

पायऱ्या झिजवण्याची वेळ; बांदा, तळवडेतील पूरग्रस्तांची व्यथा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः बांदा व तळवडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी, व्यावसायिक सप्टेंबर २०१९ च्या पुराच्या नुकसान भरपाईपासून आजही वंचित आहेत. तब्बल साडेतीन वर्ष उलटूनही बऱ्याच नुकसानग्रस्तांना येथील तहसीलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. कोरोना आणि अन्य तांत्रिक गोष्टींमुळेच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास वेळ गेला असे महसुलकडून सांगण्यात आले.
बांदा व तळवडे या गावांना नेहमीच पावसाळ्यात पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. तेरेखोल नदीला जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुराने तर बांदा पंचक्रोशी हादरुन सोडली होती. येथे नुकसानीचा आकडा भयंकरच होता. मात्र, सप्टेंबर २०१९ मध्ये आलेल्या पुरात बांदा बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली गेली होती. त्यावेळी मंत्री दिपक केसरकर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. बांदा बाजारपेठ पुर्णतः पाण्याखाली आल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. दुकानातील सामान अक्षरशः फेकून देण्याची पाळी व्यापाऱ्यांवर आली होती. स्थानिक रहिवाशांचेही नुकसान झाले होते. तळवडे येथेही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. भात शेतीही वाहून गेली होती. तालुक्यात बऱ्याच गावांना याचा फटका बसला होता. पालकमंत्री केसरकर यांनी महसूल यंत्रणेला ताबडतोब नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शासनाकडूनही याची दखल घेत विशेष पॅकेज नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली होती; मात्र काही कारणास्तव ही नुकसान भरपाई व्यापाऱ्यांच्या खात्यात पडण्यास अडचणी आल्या होत्या. त्यात दोन वर्षे कोरोनामुळे, दोन वर्ष निधी नसल्याने ही भरपाई रखडली होती. अलिकडेच टप्प्या टप्प्याने ही रक्कम नुकसानग्रस्ताच्या खात्यात जमा होत आहे; मात्र अजुनही बरेचजण भरपाईपासून वंचित असल्याने ते दररोज येथील तहसिल कार्यालयाच्या पायर्‍या झिजवत आहेत. काही कागदपत्रे अपुरी असल्याने त्यांना पुन्हा-पुन्हा तहसिलमध्ये फेऱ्या माराव्या लागत असल्याने ‘भीक नको; पण कुत्र आवर’, अशी पतिक्रिया त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
---
२९८ शेतकरी नुकसानग्रस्त
पुरात तब्बल २९८ शेतकरी व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. येथील महसूलकडेही या शेतकऱ्यांचे पंचनामे आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून आतापर्यंत २११ शेतकऱ्यांना ६५ लाख ११ हजार ४२५ रुपयांचे वाटप केले आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकऱ्यांनाही हे वाटप सुरू आहे. जवळपास ९७ शेतकरी शिल्लक राहिले असून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जात आहे. अजूनही ३६ लाख ४२ हजार ५०० रुपये वाटप करणे बाकी आहे. काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी अजून येत असल्याने ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करताना अडचणी येत आहेत. तरीही लवकरच रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्याची आशा महसूलकडून व्यक्त करण्यात आली.
------------
कोट
सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि तळवडे येथील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आवश्यक रक्कम प्राप्त झाली आहे. जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित काही शेतकरी अद्यापही या भरपाईपासून वंचित आहेत. वंचित शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून टप्प्याटप्प्याने ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल; मात्र कोणीही शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार नाही.
- अरुण उंडे, तहसीलदार, सावंतवाडी