
संक्षिप्त
rat०६३४.txt
(पान ५ साठी, संक्षिप्त)
खेडमध्ये लोकहित सामाजिक संस्थेची स्थापना
खेड ः तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी येथील तरुणांनी एकत्र येत लोकहित बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. संस्थेचे काम हे तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहे. याकरिता एक हात मदतीचा पुढे करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वेळी संघटनेच्या नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गमरे, सचिन माहिते, रोशन धोत्रे, समीर शिर्के, केवल सोनावणे, सलमान काणेकर, नागेश कदम, सुयोग धोत्रे व अतिश माहिते आदी उपस्थित होते.
--
सीए व सीएमए परीक्षेत ज्ञानदीपचे यश
खेड ः ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे-बोरज येथील विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन व सीएमए फाउंडेशन या परीक्षेमध्ये यश संपादन केले. दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया या संस्थेकडून दरवर्षी सीए (चार्टर्ड अकाउटंट) फाउंडेशन व सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउटंट) फाउंडेशन परीक्षा घेण्यात येतात. ज्ञानदीपने यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही ज्ञानदीप महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सीए व सीएमए या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. सीए फाउंडेशन या परीक्षेसाठी महाविद्यालयातील १० विद्यार्थी तर सीएमए फाउंडेशनसाठी ६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३ विद्यार्थी सीए व ६ विद्यार्थी सीएमए या परीक्षेसाठी पात्र ठरले. सीए फाउंडेशन या परीक्षेमध्ये सुजल मनवळ याने ४०० पैकी २६८, पायल घोसाळकर २३५ व सोहम संसारेने २०५ गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले तर सीएमए फाउंडेशन या परीक्षेमध्ये गणेश जाडकर याने ४०० पैकी ३२८, श्रेया रेपाळ २६६, नम्रता शेलार २५६, जान्हवी शिंदे २४८, भावेश खेडेकर २२५ तर सोहम गायकवाड २२० गुण मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
--
यंगस्टार दाभिळ संघ विजेता
खेड ः तालुक्यातील ओबीसी व्हीजेएनटी समाजातील तरुणांसाठी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा लवेल (काजूचे मैदान) या ठिकाणी झाली. या क्रिकेट स्पर्धेत यंगस्टार दाभिळ संघ प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला तर जय भवानी धामणदेवी संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. खेड तालुक्यातील एकूण ३८ गावांतील संघांनी सहभाग नोंदवला होता. चुरशीचे सामने स्पर्धेत पाहावयास मिळाले. ओबीसी समाजातील खेळाडूंना चालना देण्यासाठी आणि ओबीसी जनजागृती व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम विजेत्या यंगस्टार दाभिळ संघास रोख २१ हजार आणि चषक, द्वितीय विजेत्या जय भवानी धामण देवी संघास १५ हजार व चषक तर तृतीय विजेता संघ रामवरदायनी सोनगाव संघाला रोख रक्कम ५ हजार व आकर्षक चषक आणि चतुर्थ विजेता केदारनाथ आवाशी इलेव्हन संघाला रोख ३ हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक टी शर्ट उद्योजक व सामाजिक नेते सुनील रेवाळे यांच्या सौजन्याने देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर तुषार साळवी (धामणदेवी), अंतिम सामना सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज सुयश पाडावे (दाभिळ), उत्कृष्ट फलंदाज सुयोग रेमजे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिकेत पाडावे (दाभिळ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रमुख पाहुणे संदीप राजपुरे, राजेंद्र चांदीवडे, अध्यक्ष सचिन गोवळकर यांच्यासह सर्व कर्मचारी व पदाधिकारी, संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लवेल पंचक्रोशीतील येथील सामाजिक कार्यकर्ते व खेळाडू यावेळी उपस्थित होते.
--
ऐनवरे नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा
खेड ः ऐनवरे-पाताळी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्राची चाळण झाली आहे. या नदीसह डुबी नदीपात्रातून होणारे बेकायदेशीर वाळू उत्खनन न थांबल्यास व येथील मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ऐनवरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी दिला आहे. या गावातून वाहणाऱ्या पाताळी नदीतून सातत्याने वाळू उपसा केल्यामुळे नदीचे पात्र बदलले आहे. यामुळे नदीकिनाऱ्यावरील शेतजमिनींची धूप होऊन शेतीचे नुकसान होत आहे. महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर वाळू उपसा बंद करण्याऐवजी प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. ऐनवरे मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. नदीपात्राची चाळण झाली आहे. ही बाब मंडळ अधिकाऱ्यांना माहिती असूनही दुर्लक्ष केले आहे. डुबी नदीपात्राचीही हीच अवस्था आहे. प्रांताधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
-
खेडमध्ये उद्यापासून जेसी फेस्टिव्हलची धूम
खेड ः जेसीजच्यावतीने आयोजित केला जाणारा जेसी फेस्टिवल यावर्षी ७ ते १२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाडनाका येथील मैदानात होणार असून या फेस्टिव्हलची धूम आजपासून सुरू होणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ७ वा. होणार आहे. या वेळी दुबई येथील उद्योजक बशीरभाई हजवानी, अजय बिरवटकर, मितेश तलावडेकर, प्रांताधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, मुख्याधिकारी हर्षला राणे, पोलिस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद यांच्यासह जेसीज अध्यक्ष प्रथमेश खामकर, अमित कदम, आशिष रेपाळ, अमर दळवी आदी उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये औद्योगिक प्रदर्शन, ग्राहकमेळा, खाद्य महोत्सव, आनंदमेळा यांच्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत.
--