
तिघा संशयितांना दापोलीत पकडले
rat०६५०.TXT
(पान ३ साठी)
खून प्रकरणी दापोलीतून तिघे संशयित ताब्यात
खानापुरातील युवकाचा खून ; सातारा पोलिसांची कामगिरी
दाभोळ, ता. ६ : सातारा जिल्ह्यातील खानापुर (ता. वाई) येथील युवकाच्या खून प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळण्यात सातारा पोलिसांना दापोली पोलिसांच्या मदतीने यश आले. दापोली शहरातील बुरोंडी नाका येथे हर्णै मार्गावरील सागरी पोलीस तपासणी नाका येथे तिघांना जेरबंद करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, खुनाच्या गुन्ह्यातील संशयित हे साताऱ्यातून दापोली तालुक्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. संशयितांचे मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक दापोली येथे दाखल झाले होते. ते गेले दोन दिवस दापोली तालुक्यात या संशयितांचा शोध घेत होते. दुचाकीवरून ट्रिपल सीट हे संशयित हर्णैकडुन दापोलीच्या दिशेने येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. दापोली शहरातील बुरोंडी नाका चेक पोस्ट येथे त्या तिघांना पकडण्यात आले. सातारा जिल्ह्यातील खानापूर (ता. वाई) येथील २२ वर्षाच्या एका युवकाचा परखंदी - शेंदूरजणे गावाच्या सीमेवर असलेल्या एका शेतात दगडाने व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. अभिषेक रमेश जाधव असे त्या मृत तरुणाचं नाव आहे. बहिणीबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणातून गावातील मित्रानेच त्याचा काटा काढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली होती. दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन दिवसांपासून भुईंज पोलिस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, मोहिते आणि एलसीबीचे सचिन ससाणे, धिरज महाडीक हे सर्व वेषांतर करून सापळा लावून बसले होते. त्या वेळी तपास कामातील तांत्रिक बाबींचा वापर करुन अखेर शनिवारी ( ४ रोजी) दुपारच्या सुमारास संशयित रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव व अन्य एक संशयिताला पकडण्यात आले.
खानापुर गावातील एका गरीब कुटुंबातील अभिषेक रमेश जाधव (वय २०) याला त्याचाच मित्र असणारा रहीम मुलाणी आणि प्रज्वल जाधव यांनी २ फेब्रुवारी रोजी या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले व परखंदी गावाच्या परिसरात निर्जनस्थळी एका शेतात नेले. तेथे धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर सपासप वार करुन त्याची हत्या करुन संशयितानी पलायन केले होते. या गुन्ह्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.