
क्रिकेट स्पर्धेत वालावल विजेता
क्रिकेट स्पर्धेत
वालावल विजेता
कणकवली ः तळेरे-वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावल संघाने गुढीपूर-पिंगुळी संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. गुढीपूर-पिंगुळी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या लक्ष्मीनारायण वालावल संघाला ११,१११ रुपये व चषक, तर उपविजेत्या गुढीपूर पिंगुळी संघाला ७,७७७ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय व चतुर्थ विजेत्या शिवभवानी सावंतवाडी व सिंधुपुत्र कोळोशी संघाला प्रत्येकी २,५५५ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविले. उत्कृष्ट चढाई सुमित गावडे, उत्कृष्ट पकड राजू बंगे, अष्टपैलू खेळाडू योगेश घाडी यांना रोख रक्कम आणि चषक दिला.
---
मठ-कणकेवाडीत
क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्ले ः संत लालाजी क्रीडा मंडळ मठ-टाकयेवाडीतर्फे १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत कणकेश्वर मैदान कणकेवाडी येथे गीतेश गावडे स्मृती चषक २०२३ ''एक गाव एक संघ'' क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास ८ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संत लालाजी क्रीडा मंडळ, मठतर्फे करण्यात आले आहे.
--
मालवण येथे
क्रिकेट स्पर्धा
मालवण ः अक्षय स्पोर्टस क्लब आयोजित मालवण तालुका मर्यादित अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा (मालवण प्रीमियर लिग) २० ते २२ फेब्रुवारीला मालवण या कालावधीत एसटी स्थानकामागील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे २० हजार, १० हजार, २५००, २५०० रुपये व चषक देण्यात येणार आहे. संघांनी ७ फेब्रुवारीपर्यंत गुणेश हडकर, जोएल बुतेलो यांच्याशी संपर्क साधावा.
--
रेल्वे गाड्यांच्या
वेळेमध्ये बदल
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या काही गाड्या रद्द, काही गाड्यांच्या सुटण्याच्या व पोहोचण्याच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे. ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस (१६३३७) ११, १३, १८, २०, २५, २७ फेब्रुवारीला, तर एर्नाकुलम-ओखा एक्स्प्रेस (१६३३८) ८, १०, १५, १७, २२ फेब्रुवारी व १ मार्चला, तिरुनवेली दादर एक्स्प्रेस ८, १५, २२ फेब्रुवारी व १ मार्चला, तर दादर तिरुनवेली एक्स्प्रेस (२२६२९) ९, १६, २३ फेब्रुवारी व २ मार्चला रद्द राहणार आहे. इंदोर-कोचुवेली एक्स्प्रेस ७, १४, २१, २८ फेब्रुवारीला, तर कोचुवेली-इंदोर एक्स्प्रेस १०, १७, २४ फेब्रुवारी व ३ मार्चला रद्द राहणार आहे.
---
बिडयेंचे आर्टिकल
नागपुरात सादर
कणकवली ः नागपूर येथे २० ते २२ जानेवारी या कालावधीत झालेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल मेळाव्यामध्ये फोंडाघाट येथील दुर्गेश बिडये यांनी फार्मास्युटिकल सायन्स याविषयी तयार केलेल्या आर्टिकल्सचे सादरीकरण पार पडले. दुर्गेश यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना याविषयी माहिती दिली. मेळाव्याचा प्रारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. दुर्गेश सध्या जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर येथे पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.
-
रेडीत १७ ला
धार्मिक कार्यक्रम
रेडी ः रेडी-बोमडोजीचीवाडी येथील श्री साईबाबा मंदिर कळस पुनःस्थापना सोहळा १७ ला ११.३० वाजता होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी साडेसातला पूजा, पावणेबाराला मंदिर कळस पुनःस्थापना, दुपारी १२.३० वाजता आरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती, भजन असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन प. म. राऊत यांनी केले आहे.
--
माणगावात रविवारी
सन्मान सोहळा
सावंतवाडी ः कोकणात पर्यायने महाराष्ट्रात उद्योजक उभारणीचे काम डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प अविरतपणे करत आहे. नोकरीच्या मागे न धावता सुशिक्षित तरुणांनी उद्योग सुरू करून त्याआधारे अनेकांच्या चरितार्थाचा आदर होणे ही कौतुकास्पद बाब असून, अशा नवदुर्गांचा सन्मान सोहळा रविवारी (ता. १२) डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव येथे दुपारी ४ वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयं संघचालक (कोकण प्रांत) सतीश मोड, लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालय उपसंचालक अभय दप्तरदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला परिसरातील जास्तीत जास्त तरुण-तरुणांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब नेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली आहे.