
बांद्यात माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा
81073
बांदा ः ‘गेट टुगेदर’निमित्त एकत्रित आलेले मडुरा हायस्कूलचे मित्र-मैत्रिणी.
बांद्यात माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा
बांदा, ता. ७ ः मडुरा हायस्कूलच्या दहावीच्या १९८८-८९ बॅचचे ‘गेट टुगेदर’ बांदा येथे नुकतेच झाले. तब्बल ३३ वर्षांनंतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. व्यस्त व धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारून मित्रमैत्रिणी एकत्र जमले होते.
शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदरनिमित्त एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपापली सुखदुःखे एकमेकांकडे व्यक्त करताना दिसत होते. नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक विचारपूस करताना दिसत होते. शिक्षकांची माहिती, शाळेच्या भौतिक समस्या, आवश्यक बदल यासंबंधीही सर्वांनी चर्चा केली. यानिमित्ताने स्नेहभोजन, कराओके सिंगींग, विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. या स्नेहमेळ्यात प्राथमिक शालेय स्तरापासूनच्या अनेक आठवणी, शाळेतील किस्से, दंगामस्ती यांना उजाळा मिळाला. नोकरी, व्यवसायात अनेकांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात भगवान कासकर, अर्जुन परब, विठ्ठल धुरी, जयेश माधव, राजन धुरी, राजेंद्र भाईप, विद्याधर नाईक, संतोष चिंदरकर, गोपाळ सातार्डेकर, अजित शेर्लेकर, सुधीर ठाकूर, उल्हास परब, गुंडू कुणकेरकर, राजाराम शेर्लेकर, तातो पावसकर, उमेश पंडित, शिवराम जाधव, महेश तळगावकर, तुकाराम पंडित, गोविंद ठाकूर, नंदा पांचाळ, भारती शेटकर, रेषा भगत, वनिता भाईप, सुजाता आरोसकर, कु़ंदा भगत, ज्योती सावंत, कल्पना गावडे आदी सहभागी झाले होते.