शिंदे गटाची मदत ठरणार भाजपसाठी लाख मोलाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाची मदत ठरणार भाजपसाठी लाख मोलाची
शिंदे गटाची मदत ठरणार भाजपसाठी लाख मोलाची

शिंदे गटाची मदत ठरणार भाजपसाठी लाख मोलाची

sakal_logo
By

भाजपची गणिते लोकसभेची--लोगो

शिंदे गटाची मदत ठरणार भाजपसाठी लाख मोलाची
लोकसभा निवडणूक ः उमेदवार कोण याबाबत उत्सुकता
संदेश सप्रेः सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ७ः आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील राजकीय स्थितीचा आढावा घेता रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाकडून होणारी मदत भाजपसाठी लाखमोलाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे या वेळी उमेदवार कोण असणार याची उत्सुकताही वाढली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ भाजप स्वबळावर लढवणार हे निश्चित आहे. यासाठी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार नीलेश राणे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावे चर्चेत आहेत. अर्थात् भाजपकडून या वेळी धक्का तंत्राचाही वापर होऊ शकतो. त्यामुळे उमेदवार कोण? याची उत्सुकता ताणली गेली आहे.
या मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहता ही लढत भाजपसाठी आणखी सोपी होणार आहे. मागील वेळी संपूर्ण मतदार संघातील ६ पैकी ५ आमदार सेनेचे तर केवळ १ आमदार भाजपकडे होता. राज्यातील राजकीय स्थिती पालटल्यानंतर येथील राजकीय गणित सेनेच्यादृष्टीने धोक्याचे बनत निघाले आहे. सद्यःस्थितीत ६ पैकी केवळ २ आमदार सेनेच्या ठाकरे गटाकडे असून १ भाजप, १ राष्ट्रवादी, २ शिंदे गटाचे आमदार आहेत. यातील रत्नागिरी जिल्ह्यातील ३ पैकी १ ठाकरे गट, १ शिंदे गट आणि १ राष्ट्रवादी अशी आकडेवारी आहे. ठाकरे गटाच्यादृष्टीने हुकमाचा एक्का ठरणारे आमदार उदय सामंत हे शिंदे गटात गेले आहेत. सामंत यांची राजकीय ताकद सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून ठाकरे गटाला मोठा झटका बसू शकतो. राजापूरचे आमदार राजन साळवी हेच एकमेव ठाकरे गटासाठी आशेचा किरण आहेत. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघ राष्ट्रवादीकडे असून महाविकास आघाडी झाल्यास इथे ठाकरे गटाला मदत होऊ शकते; मात्र येथील माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात गेल्याने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाची मते फुटण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे याचा फटका अर्थातच ठाकरे गटाला बसणार हे उघड आहे. मागील वेळी या तिनही विशेषत: राजापूर, रत्नागिरी मतदार संघाने विद्यमान खासदारांच्या जिंकण्याचा फरक वाढवला होता. हाच फरक या वेळी दुपटीपेक्षा खाली येण्याची शक्यता अधिक आहे. सिंधुदुर्गात राणे आणि केसरकर हे सुद्धा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यामुळे ही लढत नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. एकूणच आत्ताच्या राजकीय स्थितीचा आढावा घेता रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाकडून भाजपला होणारी मदत ही लाखमोलाची ठरणार यात शंका नाही.
----------
कोट
राज्यात आमची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहोत. भाजपने उमेदवार दिल्यास आम्ही आदेशानुसार नक्कीच प्रामाणिकपणे काम करू.
- प्रमोद पवार, तालुकाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना