रत्नागिरी- स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद
रत्नागिरी- स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी- स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

sakal_logo
By

स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

मंत्री उदय सामंत ; विमानतळाला विमानतळाचे नाव

रत्नागिरी, ता. 7 : रत्नागिरी विमानतळाचे लोकमान्य टिळक विमानतळ, असे नामकरण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. गुगलवर सर्च केले तर, ते लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव दिसते, परंतु ते अधिकृत नाही. आता याबाबत आम्ही अधिकृत निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीसाठी स्थापण्यात येणाऱ्या स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसात त्याबाबत अध्यादेश निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज महत्त्वाच्या चार बैठका झाल्या. याला सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. आंबा बागायतदारांसाठी पहिला ठोस निर्णय घेण्यात आला तो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी 200 कोटीची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील 2 लोकांना घेतले जाईल. शेती मालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल. आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाय योजना करण्याबाबत चर्चा झाली. आंबा फळाच्या सुरवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बोर्डाबाबत आठ दिवसात अध्यादेश निघेल. पाच वर्षांपूर्वीच्या काजू आणि आंबा बोर्डालाही मोठा निधी मंजूर झाला होता. त्याचे काम सुरू आहे. परंतु आता आंब्यासाठी हे स्वतंत्र बोर्ड असेल.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव आहेत. या समाजाला न्याय देण्यासाठी रत्नागिरीतील अभियंत्रिकी महाविद्यालयाला (इंजिनिअरिंग कॉलेजला) लोकनेते शामराव पेजे महाविद्यालय नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलुंडमध्ये 5 कोटीचे वसतिगृह निधीवाचून पडले आहे. त्यालाही 7 कोटीची निधी देऊन त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाचेही काम सुरू होणार आहे. रत्नागिरी मेडिकल कॉलेजच्या कामासाठी डीनची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत कागतपत्रांची पूर्तता गेली जाणार आहे. जिल्हा नियोजनमधून 50 लाखातून शास्त्री आणि गौतमी नदीतील गाळ काढला जाणार आहे.
-----------
चौकट-
कोस्टल हायवेचा लवकरच डीपीआर
सागरी महामार्गाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या कोस्टल हायवेचा लवकरच डीपीआर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन ते साडे तीन हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. या मार्गावर रुंदीकरण, जिथे जोड रस्ता नाही तिथे पूलं उभारण्यात येणार आहेत. पर्यटन वाढीच्यादृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
--------
चौकट-
ठेकेदाराला 17 कोटी
जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या हायटेक बसस्थानकांच्या रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. रत्नागिरी बसस्थानकासाठी ठेकेदाराला 17 कोटी देण्याचा निर्णय झाला आहे. ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि ती लवकरच पूर्ण होतील, असे सामंत म्हणाले.

--------शेळके------------