सीताराम परब यांचा
आंब्रड येथे सत्कार

सीताराम परब यांचा आंब्रड येथे सत्कार

सीताराम परब यांचा
आंब्रड येथे सत्कार
कुडाळ ः आंब्रड येथील श्री हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन, मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन बाजारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी वेर्लेकर यांच्या हस्ते झाले. संतसेवा पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कीर्तनकार सीताराम परब, प्रकाश कदम, अरविंद पांगम, ज्ञानेश्वर मुंज, किरण पारकर, रश्मी कसालकर, नयना हरमलकर, श्रीमती गवस, भक्ती चव्हाण, जान्हवी मसूरकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सीताराम परब यांना अखिल सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय मंडळाचा संतसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह प्रवीण भोगटे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला.
--
तिलारी खोऱ्यात
हत्तींकडून नुकसान
दोडामार्ग ः तिलारी खोऱ्यात वावरणऱ्या रानटी हत्तींनी सोमवारी रात्री मोर्ले गावात थैमान घातले. तेथील उपसरपंच संतोष मोर्ये यांच्या केळी बागायतींचे मोठे नुकसान हत्तींनी केले. हत्तींच्या मुक्त संचाराकडे शासनाने व वनविभागाने दुर्लक्षच केले असल्याचा आरोप मोर्ये यांनी केला आहे. तिलारी खोर्‍यातील अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे नुकसान हत्तींकडून सध्या सुरू आहे. या हत्तींच्या मुक्त संचारामुळे खोऱ्यातील शेतकरी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोर्ये यांनी केली आहे.
---------------
वक्तृत्व स्पर्धेला
आंब्रडमध्ये प्रतिसाद
कुडाळ ः आंब्रड येथील श्री हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्राथमिक गटात प्राची सावंत, चैतन्य परब, चैतन्य चव्हाण यांसह मेघा दळवी, लावण्य कदम, दिशा दळवी, तर माध्यमिक गटात मृण्मयी भोगटे, दिव्या राऊळ, समृद्धी मसूरकर आदींनी यश मिळविले. पारितोषिक वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी सदस्या कल्पिता मुंज, गौरी दळवी, गंगाबाई तेली, मनीषा तेली, मानिनी काणेकर, पांडुरंग दळवी, शशिकांत तेली, प्रवीण भोगटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार वाचनालयाचे सदस्य किरण पारकर यांनी मानले.
--
रेकॉर्ड डान्स
स्पर्धा कोंडयेत
कणकवली ः कोंडये (ता. कणकवली) येथे नीलेश मेस्त्री युवा मित्र मंडळातर्फे भव्य खुली रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सायंकाळी सातला होईल. युवा मित्र मंडळातर्फे सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्याला ४००१ रूपये, उपविजेत्यास २००१ रूपये, तृतीय विजेत्यास १००१ आणि उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रोख ५०१ रुपये व सर्वांना चषक देण्यात येणार आहे. प्रियांका जेठे यांच्याशी संपर्क साधून १५ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com