वन्यप्राणी नुकसानीवर लवकरच निर्णय

वन्यप्राणी नुकसानीवर लवकरच निर्णय

81311
वाडोस ः प्रगतशील शेतकरी दादा बेळणेकर यांच्या फळबागेची राज्य समितीने पाहणी केली.

वन्यप्राणी नुकसानीवर लवकरच निर्णय

राज्य समितीची ग्वाही; माणगाव खोऱ्यातील बागायतदारांनी मांडल्या समस्या

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगाव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भाजप किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले. या समितीने सर्व आढावा घेत नुकसानीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे समितीने सांगितले.
वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ, भातशेती नुकसानीबाबत राज्यपातळीवर वन्यजीव प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत आमदार भास्कर जाधव, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम यांसह कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, कृषी विभाग पुणे आयुक्त, दापोली विद्यापीठ कुलगुरू यांचा समावेश आहे. या समितीचे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, दापोली विद्यापीठाचे डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. विनायक पाटील, कृषी विभाग कोल्हापूर जॉईंट डायरेक्टर बिराजदार, कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी माणगाव खोऱ्यात दादा बेळणेकर, प्रकाश माणगावकर, दीपक शिरोडकर या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची, फळझाडांची पाहणी केली. या पाहणीच्यावेळी बेळणेकर यांच्यासह किशोर शिरोडकर, योगेश बेळणेकर, अशोक सावंत आदी उपस्थित होते. बेळणेकर यांनी वन्य प्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेतीनुकसानीकडे समितीचे लक्ष वेधले.
---
नुकसान भरपाईबाबत विचार करा
बेळणेकर म्हणाले की, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याबाबत विचार व्हावा. सिंधुदुर्गातील शेती व बागायत ही वनांच्या जवळ असल्याने वन्यप्राणी शेतात घुसून शेतीचे नुकसान करतात. या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शासकीय नुकसान भरपाईची रकमेत योग्य ती वाढ करून मिळावी.
---
विविध फळ, पिकांचे नुकसान
नारळ, काजू, आंबा, फणस, केळी, पेरू, बांबू, अननस, सुपारी, कोकम, सीताफळ, भात, नाचणी, कुळीथ, उडीद, वाली, चवळी, भुईमूग, ऊस, मका, सोयाबिन, ज्वारी, सूर्यफुल, पाम इत्यादी पिकांचे नुकसान वन्यप्राणी रानडुकर, माकड, केडली, (लाल तोंडाची माकडे) गवा, नीलगाई, मोर, साळींदर, शेकरू, गिधाड, कोल्हा करतात, असे बेळणेकर म्हणाले.
--
समितीकडून मागण्यांची दखल
नैसर्गीक आपत्ती, वीज पडून मरणाऱ्या फळझाडांचीही नुकसान भरपाईची तरतूद आजच्या बाजार भावाप्रमाणे मिळावी, अशी मागणी शेतकरी, बागायतदारांनी केली. याबाबत निवेदनासोबत फळझाडे, फळे व भाव आदी मागण्यांचे पत्रक जोडले. याबाबत समितीने शासनाच्या परिपत्रकानुसार जे काही करता येईल, त्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येईल, यादृष्टीने तातडीने निर्णय घेऊ, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com