उपद्रवी वन्यप्राण्यात वानर, रानडुक्करांचा समावेश करा

उपद्रवी वन्यप्राण्यात वानर, रानडुक्करांचा समावेश करा

Published on

rat8p27.JPG
81376
दापोलीः तालुक्यातील बांधतिवरे येथे झालेल्या बैठकीत शेतकरी अभ्यासगटाला माहिती देताना.
-----------
उपद्रवी वन्यप्राण्यात वानर, रानडुक्करांचा समावेश करा
आमदार योगेश कदम ; बांधतिवरेत अभ्यासगटाकडून पाहणी
रत्नागिरी, ता. ८ः हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर वानर, माकड व रानडुक्कर या वन्यप्राण्यांना एक वर्षाकरिता उपद्रवी वन्यप्राण्यांच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी अभ्यासगटासमोर ठेवला आहे.
वन्यप्राण्यांमुळे फळपिक नुकसानीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने आयोजित बांधतिवरे (ता. दापोली) येथे समितीच्या भेटीप्रसंगी आमदार कदम बोलत होते. राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इ. फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहोर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. या प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत कार्यपद्धती अस्तित्वात नाही. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णयानुसार फळझाडांचा मोहोर, फुलोरा, पालवीचे वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या नुकसानीच्या प्रकरणात नुकसानीचे प्रमाण व मोबदला देण्याकरिता कार्यपद्धती ठरवणे, नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकांच्या समन्वयाखाली अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासगटाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रीय दौरे करून माहिती घ्यावी, शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारे विश्लेषण करून वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. या अभ्यासगटाने ७ फेब्रुवारीला बांधतिवरे (ता. दापोली) येथील अजितकुमार आत्माराम लयाळ यांच्या बागायतीत जाऊन, वन्यप्राण्यांकडून उपद्रव झालेल्या सुपारी, चिकू, फणस या फळझाडांची पाहणी केली.
अभ्यासगटाने क्षेत्रीय भेटीवेळी स्थानिक शेतकर्‍यांकडून वन्यप्राणी फळझाडांना कशाप्रकारे उपद्रव करतात याची माहिती घेतली. बांधतिवरे येथील समाजमंदिरामध्ये आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभ्यासगट आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये चर्चा झाली. या वेळी स्थानिक शेतकरी यांनी वन्यप्राण्यांकडून वेगवेगळ्या पिकांना होणारा प्रादुर्भाव व वन्यप्राण्यांकडून होणार्‍या मालमत्तेचे नुकसान याची माहिती दिली. या वेळी आमदार कदम म्हणाले, हिमाचल प्रदेशाच्या धर्तीवर वानर, माकड व रानडुक्कर या वन्यप्राण्यांना एक वर्षाकरिता उपद्रवी वन्यप्राण्यांच्या यादीमध्ये सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव अभ्यासगटासमोर ठेवला. या वेळी मुख्य वनसंरक्षक आर. एम. रमानुजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यासगटाकडून चिपळूण, गुहागर तालुक्यातील आढावा घेतला जाणार आहे. पाहणीचा संयुक्त अहवाल तीन महिन्यात शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेणार आहे.
-----------------
चौकट
अभ्यासगटात यांचा समावेश
शासनाने नेमलेल्या अभ्यासगटात कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकांसह संबंधित विभागाचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वनाधिकारी, चिपळूण विभागीय वनाधिकारी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. प्रकाश क्षीरसागर, उद्यानविद्या शाखा प्राध्यापक डॉ. योगेश परूळकर, वनविद्या प्राध्यापक डॉ. विनायक पाटील, कृषी विभाग आयुक्तांचे प्रतिनिधी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.