व्हेल माशाची उलटी जप्त

व्हेल माशाची उलटी जप्त

81453


‘व्हेल’च्या उलटीची तस्करी करणारे गजाआड
एलसीबीची कारवाई; सहा कोटींचा मुद्देमाल जप्त; संशयित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ८ ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च मागणी व सर्वाधिक किमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रिस) तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगली आणि मालवणमधील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो ७१० ग्रॅम उलटी, चारचाकी आणि दुचाकी असा एकूण ५ कोटी ७९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सलीम गुलाब पटेल (वय ४९, खणभाग, सांगली) आणि अकबर याकूब शेख (वय ५१, रा. पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून यात असणाऱ्या संशयितांवर लवकरच कारवाई करू, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
अधिक माहिती अशी- अवैध मालाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पेट्रोलिंग करत होते. कोट्यवधीच्या उलटीची तस्करी होणार असून विक्रीसाठी शामरावनगरमध्ये दोघे थांबल्याची गोपनीय माहिती सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली. त्यानुसार एलसीबी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी चारचाकीतून एकजण बॉक्स घेऊन उतरताना दिसला. संशय आल्याने सलीम पटेल आणि अकबर शेख यांना त्यांनी ताब्यात घेतले. अकबर शेख याच्याजवळ बॉक्समध्ये उलटी आढळली. त्याच्याकडे चौकशी करता त्याने सांगितले की, उलटी मालवण तालुक्यातील आचरामधून सलीम पटेल याच्या मध्यस्तीने विक्रीसाठी आल्याचे सांगितले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उलटीची तपासणी करत यावर प्रतिबंध असून त्याची किंमत प्रतिकिलो एक कोटी असल्याचे सांगितले. त्याच्याकडून ५ कोटी ७५ लाख ५० हजारांची ५ किलो ७१० ग्रॅमची उलटी, २५ हजारांची दुचाकी आणि ३ लाख ५० हजारांची चारचाकी असा एकूण ५ कोटी ७९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कारवाईत एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, अच्युत सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, संदीप पाटील, संकेत मगदूम, राहुल जाधव, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, संतोष गळवे, संकेत कानडे यांच्यासह वन विभागाचे वनरक्षक युवराज पाटील, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, तुषार कोरे, सागर थोरवत यांचा सहभाग होता.

चौकट
हिऱ्यापेक्षा मौल्यवान
व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रीय भाषेत अंबरग्रिस म्हणतात. व्हेलच्या आतड्यांमधून ते बाहेर पडते. खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेलची उलटी चिकट बनते. ती मेणासारखी दिसते. उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. परफ्युम शरीराला लावण्यासाठी उलटीतील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. याचमुळे परफ्युम दीर्घकाळ टिकतात. परफ्युम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात. औषधांमध्येही व्हेलच्या माशाच्या उलटीचा वापर केला जातो. बाजारपेठेत कोटींचा याला भाव मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com