गॅरेज व्यावसायिकांची एकी स्तुत्य

गॅरेज व्यावसायिकांची एकी स्तुत्य

swt९४.jpg
८१५२०
पिंगुळीः वार्षिक स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे पदाधिकारी व इतर.

गॅरेज व्यावसायिकांची एकी स्तुत्य
तहसीलदार अमोल पाठकः पिंगुळीत ‘टू व्हिलर मेकॅनिक’चा स्नेहमेळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः कुडाळ तालुका टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन संघटना केवळ कागदापुरती मर्यादित नसून प्रत्येक मेकॅनिकच्या प्रगती व उन्नतीसाठी चांगले काम करीत आहे. त्यासोबतच सामाजिक कार्यातही संघटनेचे मोठे योगदान आहे. रात्री-अपरात्रीही सेवा देण्याचे कार्य अभिमानास्पद आहे. गॅरेज व्यावसायिकांची एकी हेच संघटनेचे बळ आहे. भविष्यात व्यवसायासोबतच संघटनेने विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे गौरवोद्गार कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी काढले.
कुडाळ तालुका टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचा जिल्हा वार्षिक स्नेहमेळावा पिंगुळी-काळेपाणी येथील श्री भवानी मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळचे तहसीलदार पाठक, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, कुडाळ-वेंगुर्ले संघटक यशवंत गावडे, संघटनेचे माजी अध्यक्ष आनंद पेडणेकर, विद्यमान अध्यक्ष संदीप तेंडोलकर, सचिव गुरुनाथ धुरी, उपाध्यक्ष वैभव सुतार, खजिनदार दीपक रांजणकर, सहाय्यक खजिनदार मोहित मेथर, सहाय्यक सचिव नितीन परब, सल्लागार रियाज शेख, सहसल्लागार संदेश गावकर, कुडाळ शहरप्रमुख दिवाकर मांजरेकर, उपप्रमुख प्रकाश सातार्डेकर, शंकर सातार्डेकर, कार्यक्रम व्यवस्थापक संदीप गावडे आदींसह पदाधिकारी व जिल्हाभरातील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार पाठक म्हणाले, ‘‘आज दुचाकीसह सर्वच वाहनांचे नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्मिती झाली आहे. नवे-जुने तंत्रज्ञान प्रत्येकाने आत्मसात करायला आहे. प्रत्येक दुचाकी मेकॅनिकपर्यंत येथील मेकॅनिक असोसिएशन संघटना वाहनांमधील नवनवीन तंत्रज्ञान पोचवण्याचे काम करते. गॅरेज व्यावसायिक हा दळणवळणात महत्त्वाचे कार्य करतो. राष्ट्र उभारणीतही तो महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यावसायिकाच्या प्रगतीबरोबरच सामाजिक कार्यातही या संघटनेचे मोठे योगदान आहे. येथील गॅरेज व्यावसायिकांमधील एकीचे बळ निश्चितच कौतुकास्पद आहे.’’
यावेळी टू व्हिलर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अद्ययावत काम करणार्‍या कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत संपूर्ण देशभरात बीएस-६ तंत्रज्ञानाच्या गाड्या सर्व प्रकारच्या कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. पेट्रोल, ऑईल आणि इतर इंधनांतील घटकांमुळे वाहनांमधून प्रदूषण निर्माण होऊन पर्यावरणाला घातक असे वायू निर्माण होतात. यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर तसेच इतर पर्यावरणाच्या निगडीत असलेल्या सर्व घटकांवर त्याचा परिणाम होतो. या गोष्टी संतुलित राखण्यासाठी शासनाने बीएस-६ तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे करत असताना दुचाकी कंपन्यांच्या गाड्यांच्या पार्टमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवून सामान्य ग्राहकाला कसा फायदा होईल, या दृष्टीने बदल केले आहेत. हे बदल मेकॅनिकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविता येतील, असे मार्गदर्शन यावेळी उपस्थित कंपन्यांच्या तज्ज्ञांनी यावेळी केले.
सरपंच आकेरकर, सिंधू रक्तमित्रचे तेंडोलकर यांनी विचार व्यक्त करत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ मेकॅनिकांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. स्वागत अध्यक्ष संदीप तेंडोलकर व सचिव धुरी यांनी, सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. खजिनदार दीपक रांजणकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com