जिल्ह्यात ''सुदृढ बालक'' अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ''सुदृढ बालक'' अभियान
जिल्ह्यात ''सुदृढ बालक'' अभियान

जिल्ह्यात ''सुदृढ बालक'' अभियान

sakal_logo
By

जिल्ह्यात ‘सुदृढ बालक’ अभियान
१९७ पथकेः १ लाख ४१ हजार जणांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः जिल्ह्यात ‘जागरूक पालक- सुदृढ बालक’ अभियान आजपासून राबविण्यात येत असून यात ० ते १८ वयोगटातील १ लाख ४१ हजार ३५७ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके कार्यरत ठेवली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील मुलांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आरोग्य तपासणीच्या कामासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची १९१ व जिल्हा सामान्य रुग्णालय ६ अशी एकूण १९७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या अभियान कालावधीत शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ हजार ५०१ बालके, खाजगी शाळाची १५ हजार ६७३, आश्रम शाळा ४९, दिव्यांग शाळा १५१, अंगणवाडी ३४ हजार ५२६, खाजगी नर्सरी बालवाडी २ हजार ७५३, बाल सुधार गृह ४, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे १०६ आणि शाळाबाह्य मुले ५८४ अशी एकूण १ लाख ४१ हजार ३५७ मुलांची आरोग्य तपासणी या अभियान कालावधीत करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तशय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा अशा आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे. दुभंगलेले ओट व टाळू, मोतीबिंदू, बहिरेपणा, जीवनसत्व अ, ड, ब याची कमतरता, वाढ खुंटने, लठ्ठपणा याचाही शोध घेतला जाणार आहे.

कोट
जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल स्थापन करून या आरोग्य अभियान कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार कालबद्ध पद्धतीने आठ आठवड्यात हे अभियान पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात नियोजन केले आहे.
- डॉ. सई धुरी, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माता सुरक्षा अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर आता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात बाल सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या आरोग्य तपासणी अभियानात जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने तसेच आजारी बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत. या दृष्टीने उपाययोजना केली जाणार आहे.
- डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग