श्वेत क्रांतीसाठी एकत्रित प्रयत्न

श्वेत क्रांतीसाठी एकत्रित प्रयत्न

swt९१३.jpg
८१५४७
सिंधुदुर्गनगरीः सामंजस्य करार केल्यानंतर तो दाखविताना प्रशासक प्रजित नायर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक सीईओ प्रमोद गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर सोबत बँक संचालक व अन्य अधिकारी

श्वेत क्रांतीसाठी एकत्रित प्रयत्न
सामंजस्य करारः विविध पातळीवर काम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः जिल्ह्याच्या श्वेत क्रांतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या शाश्र्वत विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्यात तीन सामंजस्य करार आज करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी स्वाक्षरी करीत यावर शिक्कामोर्तब केले. कृत्रिम रेतन देवदाता निर्माण करणे, आदर्श गोठा बांधणी आणि बायोगॅस बांधणी यासाठी हा करार करण्यात आला. अशाप्रकारे प्रशासन, सहकारी बँक, सहकारी संस्था एकत्र येऊन काम करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे बँक अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.
जिल्हा बँक प्रधान कार्यालयात पार पडलेल्या करार कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रभारी कृषी अधिकारी विनायक ठाकूर, प्रभारी जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, विद्याधर परब, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, बँक कर्मचारी मंदार चव्हाण आदी उपस्थित होते. बँक अध्यक्ष दळवी यांनी प्रशासक नायर यांचे स्वागत केले. डॉ. देवधर व प्रमोद गावडे यांनी सामंजस्य कराराबाबत माहिती दिली.
यातील पहिला करार कृत्रिम रेतन सेवादाता (गोपाळ सेवादाता) याबाबत करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील १०० सुशिक्षित बेरोजगार युवकांना याबाबत ३५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याची शिफारस दूध संस्था करणार आहे. यासाठी एका प्रशिक्षणार्थी मागे २० हजार रुपये खर्च येणार आहे. यातील ५० टक्के खर्च जिल्हा परिषद देणार आहे. २५ टक्के खर्च जिल्हा बँक देणार असून २५ टक्के खर्च शिफारस करणारी दूध संस्था करणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर गोपाळ सेवादाता यांना आवश्यक साहित्य भगीरथ प्रतिष्ठान पुरविणार आहे. गोकुळ संघ सुद्धा काही साहित्य पुरविणार आहे. या प्रशिक्षित कृत्रिम रेतन सेवादाता याला दुचाकी खरेदीसाठी कर्ज आवश्यक असल्यास ९ टक्के व्याजाने व कर्ज परतफेड केल्यावर २ टक्के रिबेट या धर्तीवर केवळ एका जामिनदारावर ते पुरविणार आहे. त्यासाठी दूध संस्थेची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे.
दुसरा करार हा आदर्श गोठा बांधणी यासाठी करण्यात आला आहे. यासाठी लाभार्थी निवड दुग्ध संस्था आणि पशुधन विकास अधिकारी करणार असून पाच जातिवंत दुधाळ जनावरांसाठी ८० हजार रुपये, तर १० जातिवंत दुधाळ जनावरांसाठी एक लाख ६० हजार रुपये जिल्हा बँक ब्रीज लोन उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा परिषद नरेगा योजनेतून ६ जातिवंत दुधाळ जनावरांसाठी ७७ हजार रुपये, तर १८ जातिवंत दुधाळ जनावरांसाठी दोन लाख ३१ हजार रुपये अनुदान देणार आहे. हे अनुदान प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यामुळे गोठ्याचे बांधकाम रखडू नये, यासाठी जिल्हा बँक ब्रीज लोन उपलब्ध करून देणार आहे. नरेगा अनुदान जमा झाल्यावर ते जिल्हा बँकेत जमा केले जाणार आहे.
तिसरा करार बायोगॅस बांधणीसाठी झाला. जिल्हा परिषद यासाठी गावांची निवड करून बायोगॅस बांधणीसाठी नरेगा अंतर्गत अनुदान उपलब्ध करून देणार आहे. अनुदान उशिरा उपलब्ध होत असल्याने काम थांबू नये, यासाठी जिल्हा बँक २ घन मीटर बायोगॅससाठी २० हजार रुपये अनुदान पुरविणार आहे. भगीरथ प्रतिष्ठान यासाठी सक्षम गवंडी पुरविणार असून याबाबत प्रबोधन करणार आहे. अनुदान प्राप्त झाल्यावर ते बँक कर्ज खात्यात जमा केले जाणार आहे.
...........
चौकट
कृषी क्रांतीतील महत्त्वाचा दिवस
जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, जिल्हा बँक, सामाजिक संस्था आपापल्या परीने कृषी विकास, दुग्ध विकास यासाठी स्वतंत्र प्रयत्न करीत होते; मात्र हीच ताकद एकत्रित आली, तर याला वेग येऊ शकतो, हा विचार घेऊन आम्ही सामंजस्य करार केला आहे. यासाठी मी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांना धन्यवाद देतो. त्यांनी याकरिता सकारात्मक भूमिका घेतली. १४ फेब्रुवारी २०२२ ला आम्ही पाच वर्षांत एक लाख दूध उत्पादन करण्याचा संकल्प केला. आता वर्षभरात उत्पादन दुप्पट झाले असून ३० हजार झाले आहे. आदर्श गाव निवजे या गावाची निवड केली असून ८० गोठे मंजूर केले आहेत. शेतकऱ्याला कमीतकमी खर्चात दूध उत्पादन घेता यावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचा खर्च वाचविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजचा सामंजस्य करार दिवस जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे, असे बोलताना बँक अध्यक्ष दळवी यांनी सांगितले. राज्यात असा प्रयत्न प्रथमच केला जात असून तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करूया. हा प्रयोग राज्यासाठी पॅटर्न ठरेल, असेही ते म्हणाले.
................
कोट
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर यांनी, नुसता करार करून चालणार नाही. कारण त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हा सुरुवातीचा काळ महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात फिरताना महागडे मोबाईल विकत घेण्यासाठी हप्त्यावर उपलब्ध करून दिले जातात. महिन्याला हजार रुपये, अशी योजना राबविली जाते; परंतु दुधाळ जनावरे खरेदीसाठी असा लाभ देणारी संस्था दिसत नाही. मोबाईल ही वस्तू व्यक्ती विकास साधणारी नाही; परंतु दुधाळ जनावरे आर्थिक विकास साधणारी आहेत.
- प्रजित नायर, प्रशासक, जिल्हा परिषद
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com