देवरूख ः प्रचितगडावरील मंदिराचे छप्पर बसवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः प्रचितगडावरील मंदिराचे छप्पर बसवणार
देवरूख ः प्रचितगडावरील मंदिराचे छप्पर बसवणार

देवरूख ः प्रचितगडावरील मंदिराचे छप्पर बसवणार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat९p५.jpg ःKOP२३L८१५१० देवरूख ः प्रचितगडावरील भवानीमातेच्या मंदिरावर छप्पर उभारण्यासाठी इतिहासप्रेमी सरसावले.
-----------
प्रचितगडावरील मंदिराचे छप्पर बसवणार
विनोद म्हस्के पेलणार आव्हान ; प्रचंड वाऱ्याने उडतात पत्रे, मुक्कामासाठी शेडही उभारणार
संदेश सप्रे ः सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ८ ः संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड हा स्वराज्यातील एक अजिंक्यगड! या गडावर शत्रू पोहचणे सोडाच जाण्याचा कधी विचारही करू शकला नसेल असा हा दुर्गम गड. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातील गिर्यारोहक आणि पर्यटक प्रचितगड पाहण्यासाठी येत असतात. आता गडावर असणाऱ्या भवानीमातेच्या मंदिरावरील उडालेले छप्पर तयार करण्याचे काम नव्याने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विनोद म्हस्के यांनी दिली.
प्रचितगडावर असणारा वेगवान वारा मंदिरावर घातलेले पत्रे टिकू देत नाही. आत्तापर्यंत अनेकदा भक्तगणांनी भवानीमातेच्या मंदिरावर पत्रे टाकले; मात्र प्रचितगड हा सह्याद्रीचा मुकूटमणी असल्याने येथे सतत कमालीचा वारा असतो. पावसात तर या वाऱ्याचा वेग आणखी वाढतो त्यामुळे भवानीमातेच्या डोक्यावरील छप्पर टिकत नाही. गडावरील भवानीमाता जागृत असल्याने भवानीमातेच्या डोक्यावर छप्पर नाही याची खंत असंख्य भक्तांच्या मनात आहे.
शृंगारपूरचे कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमी विनोद म्हस्के यांनी प्रचितगडावर जाण्यासाठी शिडीचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याने त्यांनी गावामधील मंडळींसह मुंबईतील कार्यकर्त्यांजवळ प्रचितगडावर भवानीमातेच्या मंदिराला छप्पर करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. याबाबत प्राथमिक बैठकादेखील झाल्या आहेत. शासनाकडून आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून निधी मिळाला तर उर्वरित निधी लोकवर्गणीतून उभा करून मजबूत छप्पर उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. याबरोबरच प्रचितगडावर येणाऱ्या इतिहासप्रेमींना गडावर मुक्काम करण्यासाठी लांब रूंद कायमस्वरूपी शेड उभारण्याचादेखील मंडळाचा मानस आहे. या शेडमध्ये जेवण करण्यासाठी भांडी आणि बादल्यादेखील ठेवल्या जाणार आहेत. तसेच गडावरील भाग सतत प्रकाशमान राहावा यासाठी सौरऊर्जेचे दिवेदेखील बसवले जाणार असल्याचे विनोद म्हस्के यांनी सांगितले .

चौकट
ऐतिहासिक स्थळे जपायलाच हवीत

संगमेश्वर मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक स्थळांचे जतन करायला हवे; मात्र संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड ही केवळ कोकणची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. यासाठी प्रचितगडावर जाणाऱ्या शिडी आणि रस्त्यासाठी क वर्ग पर्यटनमधून तब्बल २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारकासाठीदेखील ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. प्रचितगडावर जाण्यासाठी अल्पावधीत आणि मजबूत शिडी उभारली गेली याचा नक्कीच आनंद आहे. आता भवानीमातेच्या मंदिराचा विकास करण्यासाठी शासनस्तरावर काय मदत करता येईल याचा आपण आढावा घेत असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले .

चौकट
स्टीलची मजबूत शिडी उभारली
या आधी शेवटच्या टप्प्यात गडावर नेणाऱ्या शिडीची दुरवस्था झाली होती. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या वृत्ताची दखल घेत शिडीच्या दुरुस्तीसाठी क वर्ग पर्यटनामधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शृंगारपूर येथील विनोद म्हस्के या युवकाने सर्व अडचणींवर मात करत आज नवीन स्टीलमधील मजबूत शिडी उभारण्याचे काम पूर्ण केले आहे.