
होळीनिमित्त कोरे मार्गावर विशेष गाड्या सोडा
rat०९३३.txt
(पान २ साठी)
कोरे मार्गावर विशेष गाड्या सोडा
खेड, ता. ९ ः कोकणचा प्रमुख सण असलेल्या होळी सणासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांत ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी फिरत असल्यामुळे कोकणी बांधव मोठ्या संख्येने पालघर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरातूनच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगोत्सवातही आपल्या मूळ गावी जातोच. यावर्षी होळी पौर्णिमा ६ मार्चला असून त्यापुढील साधारण १५ दिवस पालख्या घरोघरी फिरवल्या जातील. त्यामुळे ३ ते २२ मार्चपर्यंत मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असेल.
मध्यरेल्वेने सध्या मुंबई आणि मंगळुरूदरम्यान ३१ मार्चपर्यंत आठवड्यातून केवळ एक दिवस चालणारी लोकमान्य टिळक टर्मिनस सुरतकल विशेष गाडी सोडली आहे; परंतु ती पनवेलच्या पुढे केवळ रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथेच थांबणार आहे. त्यापुढे या गाडीला साधारण प्रत्येक ३० किलोमीटरवर एक थांबा आहे; परंतु रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटर, रोहा ते खेड ९८ किलोमीटर आणि पनवेल ते रोहा ७५ किलोमीटर इतक्या मोठ्या अंतरात या गाडीला कोणतेही थांबे नसल्याने महाराष्ट्राच्या बऱ्याचशा तालुक्यांना या गाडीचा काहीही लाभ होणार नाही. हा सण प्रामुख्याने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात साजरा केला जात असल्याने इतर महत्वाच्या स्थानकांसोबतच माणगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, सावर्डा, आरवली आदी स्थानकांत थांबणाऱ्या विशेष गाड्यांची अतिशय आवश्यकता आहे तसेच मुंबईतून रत्नागिरी आणि चिपळूणसाठी स्वतंत्र गाड्या सोडणे गरजेचे आहे.