
वायरची बंडले चोरीप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी
वायर बंडल चोरणाऱ्या
दोघांना पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः घरासमोर ठेवलेली ६० हजारांची इलेक्ट्रिक वायरची दोन बंडले चोरून नेल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघा परप्रांतीय कामगारांना काल रात्री उशिरा अटक केली. धीरा लक्ष्मण नाईक-चव्हाण (वय ४५) व संतोष फोमा नाईक-चव्हाण (वय ३४, दोघे रा. मेरशी-गोवा) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांना आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी ठेकेदार सुनील राऊळ यांनी रविवारी (ता. ५) येथील पोलिसांत तक्रार दिली होती.
राऊळ हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून ते बांदा-दोडामार्ग रस्त्यावर जुना स्टॅन्ड येथे राहतात. त्यांनी आपल्या घरासमोर इलेक्ट्रिक वायरची बंडले उतरवली होती. त्यातील १४५ किलो व ९० किलो वायरची ६० हजार ५६२ रुपयांची दोन बंडले चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. राऊळ यांनी रविवारी येथील पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर भोसले अधिक तपास करत होते. दोन्ही संशयितांना काल (ता. ८) सायंकाळी उशिरा गोवा येथून ताब्यात घेण्यात आले. आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली.