
सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी दोघांची जामिनावर सुटका
सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी
दोघांची जामिनावर सुटका
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः ओरोस-खर्येवाडी येथील सिध्दीप्रिया बिल्डिंगच्या शेजारी सामान ठेवण्यासाठी केलेल्या गाळ्यातील १२५ लोखंडी सेंट्रींग प्लेट चोरीच्या आरोपातून दोघांची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड. प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.
७ जुलै सायंकाळी ४ ते ९ जुलै २०२२ च्या दरम्यान सिद्धीप्रिया बिल्डिंगच्या शेजारी साहित्य ठेवण्याच्या गाळ्याचे कुलूप तोडून १२५ लोखंडी सेंट्रींग प्लेट चोरीला गेल्याची फिर्याद सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना संशयित राजन आनंद सडवेलकर (रा. नेरुर जकात), साईराम मंगेश म्हाडदळकर (रा. पिंगुळी करमळगाळू) यांना अनुक्रमे २३ व २५ जुलै २०२२ ला अटक केली होती. या प्रकरणी सरकार पक्षाकडून एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच संशयितांतर्फे ॲड. मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.