
रत्नागिरी- आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा
फोटो ओळी
-rat10p24.jpg-KOP23L81792
रत्नागिरी : पत्रकार घातपातप्रकरणी मूक निदर्शनानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देताना रत्नागिरीतील पत्रकार.
आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवा
पत्रकारांची आंदोलनाने मागणी ;काँग्रेसही आंदोलनात सामील
रत्नागिरी, ता. १० : राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर राज्यभरात पत्रकार संघटनांनी निदर्शने केली. रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकारांनी काळ्या फिती लावून मूक निदर्शने केली आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन दिले. वारीशे यांच्या हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि कडक शिक्षा करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
वारीशे हे सोमवारी कोदवली येथून दुचाकीने जाताना मोटारकारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले व कोल्हापूरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा आरोप पत्रकारांनी केला. शशिकांत वारीशे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते पंढरीनाथ आंबेरकर कारचालक होते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून राज्यातील सर्व पत्रकारांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी पत्रकारांनी केली. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पत्रकारांनी शासनाला दिला आहे. दरम्यान काँग्रेसच्यावतीने अश्विनी आगाशे, रूपाली सावंत, रिझवाना शेख यांनी आंदोलनात सहभागी होऊन हत्येचा निषेध केला.
चौकट 1
कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी
रिफायनरी प्रकल्पाच्या दोन बाजू आहेत. समर्थन व विरोध असे आमनेसामने असताना वृत्तपत्रांना दोन्ही बाजू समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. वारीशे वृत्तपत्रातून आपले काम करत होते. असे असताना विरोधात बातमी आली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे. वारीशे यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली.