
संक्षिप्त
संदेश झेपलेंचे निबंध स्पर्धेत यश
देवरूख ः शहरातील देवरूख नं. ४ शाळेचे शिक्षक व पूर गावचे रहिवासी संदेश झेपले यांना रत्नागिरी येथे झालेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे. देशभरात नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. भाजपा रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मोदींची लोकप्रियता व त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी देशाची वाटचाल यामुळे दक्षिण रत्नागिरीतील शेकडो स्पर्धकांनी खुल्या गटामध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. झेपले यांनी ''आपले पंतप्रधान ः नरेंद्र मोदी एक अंगार'' या विषयावर निबंध लिहिला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. त्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. शिवाय बक्षीसपात्र निबंध प्रकाशित केले जाणार आहेत, असे संयोजक नीलेश आखाडे यांनी सांगितले.
बुरंबी ते देवशेत वाशी रस्ता कधी होणार?
देवरूख ः संगमेश्वर तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. यापैकी बुरंबी ते देवशेत वाशी हा १५ किमीचा मार्ग धोकादायक बनला आहे. मुळातच रस्ता हरवलेला आहे. रस्ता शोधताना खड्ड्यांमुळे दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. एसटी सेवा जीव मुठीत धरून सुरू आहे. काही किमीचा रस्ता या आधी झाला होता; मात्र तोही आता अखेरच्या घटका मोजताना दिसून येत आहे. यामुळे कामाचा दर्जा काय होता हे दिसून आले. गावकर्यांची सहनशक्ती संपली आहे. आंदोलन करावे का याची तयारी बैठका घेऊन सुरू आहे. निवडणुकीत काय करायचे याचेही धोरण ठरवले जात आहे. निधी मंजूर आहे असे सांगितले जात आहे; मात्र डांबरीकरणाला कधीचा मुहूर्त आहे हे कोणी सांगत नाही. त्यामुळे आता गावकरी लवकरच रास्ता रोको आंदोलन करतील, असे वातावरण तयार होऊ लागले आहे. संबधित विभागाने लवकरात लवकर हा मार्ग सुखकर करावा, अशी मागणी होत आहे.
सोळजाई मंदिर जीर्णोद्घाराचा वर्धापनदिन
साडवली ः सोळजाई मंदिर जीर्णोद्घाराचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात झाला. सकाळी महाकाली यज्ञ तसेच भाविकांमार्फत होम हवनाचे विधी पार पडले. आरती झाल्यावर हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला. शिस्तबद्घता व नियोजन व संपूर्ण गावाची एकजूट सार्यांनी अनुभवली. शनिवारी सकाळी देवीची प्रतिमा रथात ठेवून संपूर्ण शहरातून मिरवणूक निघणार आहे. ८.३० वा. ही मिरवणूक निघणार आहे. सात ते आठ हजार नागरिक यात सहभागी होणार आहेत. दुपारी महाप्रसाद व रात्री झांजगी नमन सादर होणार आहे.
-----
रत्नागिरी पालिकेचा क्रिकेट संघ
महाबळेश्वरला रवाना
रत्नागिरी ः महाबळेश्वर गिरिस्थान नगर पालिका व कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी गणेश पाडळकर अध्यक्ष, रत्नागिरी नगर पालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी नगर पालिकेचा क्रिकेट संघ महाबळेश्वरला रवाना झाला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगर पालिका व कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ कबड्डी व क्रिकेट राज्यस्तरीय भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. याच ठिकाणी २०२० मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रत्नागिरी नगर पालिकेने सुमारे ७० नगरपालिका, नगरपंचायत संघामधून कबड्डी स्पर्धेसाठी उपविजेता संघ म्हणून बहुमान पटकावलेला होता. दोन-अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा महाबळेश्वर गिरीस्थान नगर पालिका व कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पालिका व नगरपंचायती कबड्डी व क्रिकेट राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे.
------
दादा इदाते यांच्या सन्मानार्थ
रविवारी सायकलफेरी
दाभोळ ः कर्मवीर दादा इदाते यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. इदाते यांच्या समाजकार्याचा सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी (ता. १२) फेब्रुवारीला सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७.३० वा. सुरू होणार आहे. रूपनगर, ऐश्वर्यनगर, श्रीगुरूनगर, लष्करवाडी जालगाव, गणेशनगर, आनंदनगर उदयनगर आझाद मैदान अशी ६ किमीची असणार आहे. या फेरीदरम्यान जालगाव आनंदनगर येथील इदाते यांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात येणार आहे.
------
पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना निवेदन
देवरूख ः रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्यावतीने देवरूख पोलिस ठाणे, संगमेश्वर पोलिस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा संगमेश्वर तालुका प्रेस क्लबतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या वेळी संगमेश्वर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मोहिते, उपाध्यक्ष संतोष पोटफोडे, उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, सचिव नीलेश जाधव, सहसचिव मिथून लिंगायत, खजिनदार सुरेश करंडे, सदस्य दीपक भोसले, मकरंद सुर्वे, प्रमोद हर्डीकर, अमृतराव जाधव, मीरा भोपळकर आदी उपस्थित होते.