
मोटार पार्किंवरून कुडाळात बाचाबाची
मोटार पार्किंवरून
कुडाळात बाचाबाची
कुडाळ, ता. ११ ः रस्त्यावर मोटार उभी करण्याच्या कारणावरून काल (ता. १०) दोन युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यात एका महिलेने अतिशय खालच्या पातळीच्या शिव्यांचा वर्षाव केल्याने स्थानिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
शहरातील नक्षत्र टॉवर येथे एका पक्षाच्या युवकाने मोटार उभी केली होती. तर बाजूलाच रस्त्यानजीक शहरातील युवकांनी मोटार थांबविली होती. नक्षत्र टॉवर येथून मोटार पर्यायी मार्गाने न नेता त्या पक्षाच्या युवकाने दुचाकीसाठी असणाऱ्या जागेतून आपली मोटार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी या ठिकाणी शहरातील एक मोटार उभी होती. मोटार पुढे-मागे घेण्याच्या कारणावरून दोन्ही युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे एवढ्यावरच न थांबत त्या ठिकाणी पक्षाच्या युवकांसमवेत असणाऱ्या महिलेने मोटारीवर लाथा मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय खालच्या पातळीवरील शिव्यांचा वर्षाव केल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसही दाखल झाले; यावेळी संबंधित महिला शहरातील युवकाने मोटार अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे ओरडून सांगू लागली; मात्र पोलिसांनी तिघांनाही ठाण्यात नेले. दरम्यान, महिलेने केलेल्या शिव्यांच्या वर्षावाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.