
मळगाव रेल्वे स्थानकात असुविधा
82257
मळगाव ः रेल्वे स्टेशन मास्तर गावकर यांच्याशी चर्चा करताना मनसे पदाधिकारी.
मळगाव रेल्वे स्थानकात असुविधा
मनसेची खंत; विविध समस्यांबाबत स्टेशनमास्तरांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः कोकण रेल्वेच्या सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नांसंदर्भात तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी व तक्रारींबाबत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मळगाव स्टेशन मास्तर सौ. गावकर यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. त्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्याचे आश्वासन सौ. गावकर यांनी दिले.
कोकण रेल्वेच्या मळगाव रेल्वे स्थानकावर सुविधांची गैरसोय असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षण खिडकी, तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना ताटकळत राहावे लागत असून त्याबाबत मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी लक्ष वेधले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांना थांबा मिळावा. प्रवाशांना वेळेचा होणारा भुर्दंड थांबावा, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. कोकण रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ‘टीसी’कडून मोबाईल काढून घेतला जाण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्याबाबतही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी प्रवाशांना होणाऱ्या त्रासांबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. मळगाव रेल्वे स्थानकातील सुविधा पूर्ववत केली जाईल. ‘टीसी’ संदर्भात प्रवाशांना झालेल्या त्रासाची दखल घेतली जाणार असून त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन स्टेशन मास्तर गावकर यांनी दिले. मनसे पदाधिकारी राजू कसकर यांनी मळगाव रेल्वे स्थानकावर जलदगतीच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी यावेळी केली. त्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्याचे आश्वासन गावकर यांनी दिले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष कासकर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, प्रमोद तावडे, प्रणित तळकर, साहिल नाईक आदी उपस्थित होते.