
आचरा-कणकवली मार्गावरील गतिरोधक तातडीने हटवावेत
आचरा-कणकवली मार्गावरील
गतिरोधक तातडीने हटवावेत
विजय सावंत यांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ ः आचरा-कणकवली मार्गाच्या नूतनीकरण कामात ठेकेदाराकडून रस्त्यावर बेसुमार घालण्यात आलेले गतिरोधक वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. याबाबत वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली असून हे गतिरोधक तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वाहतूक संघटनेचे विजय सावंत यांनी दिला.
आचरा-कणकवली मार्गाचे डांबरीकरण काम सुरू झाले; मात्र रस्ता सुस्थितीत येऊनही जलद वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठेकेदाराकडून ठिकठिकाणी तब्बल सतरा गतिरोधक घालण्यात आले आहेत. यातच यापूर्वीच्या गतिरोधकांची भर पडली असून संपूर्ण आचरा-कणकवली मार्गावर सुमारे पंचवीसच्या आसपास गतिरोधक निर्माण केले गेले आहेत. यामुळे रस्ता सुस्थितीत येऊनही पूर्वी खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना लागणारा वेळ आणि त्रास आता वाढलेल्या गतिरोधकांमुळे अनुभवावा लागत आहे. गतिरोधक घातलेल्या ठिकाणी त्यासंबंधी माहिती देणारे फलक किंवा रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या देखील मारलेल्या नसल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवली यांना गतिरोधक तत्काळ हटविण्याबाबत निवेदन देणार असल्याचे प्रवाशी वाहतूक संघाचे विजय सावंत यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता हे गतिरोधक नियमानुसार नसल्याचे स्पष्ट केले. लवकरच याबाबत संबंधित ठेकेदाराला गतिरोधक हटविण्यासाठी नोटीस देणार असल्याचे सांगण्यात आले.