
रंगभरण, चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
८२३०५
रंगभरण, चित्रकलेत ४०० जणांचा सहभाग
बांद्यातील स्पर्धा; श्री स्वराज्य प्रतिष्ठानचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.
सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा अंगणवाडी ते पहिली, दुसरी ते इयत्ता चौथी, पाचवी ते आठवी, नववी ते खुला असे गट ठेवण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रियांका नाईक म्हणाल्या की, शिवविचार घराघरात पोहचविण्याचे चांगले कार्य स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे. बांदा शहरात मुलांसाठी विविध स्पर्धा राबवून त्यांना शिवकार्यात सामावून घेण्याचे शिवधनुष्य प्रतिष्ठानने हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे. डॉ. पाटील म्हणाले की, पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजणे ही काळाची गरज आहे. प्रतिष्ठानच्या कार्यात समाजाने देखील योगदान देणे आवश्यक आहे. यावेळी रुपाली शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ठ चित्रांचे रेखाटन केले. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, सहखजिनदार प्रथमेश राणे, सहसचिव अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, हंसराज गवळे, जे. डी. पाटील, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, महादेव धुरी, शुभम बांदेकर, मिताली सावंत, वेदिका गावडे, वैदेही वाडकर आदी उपस्थित होते.