
सावंतवाडी भाजी मंडईसाठी २५ कोटी
82363
सावंतवाडी ः येथे नव्याने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मार्गदर्शन केले.
सावंतवाडी भाजी मंडईसाठी २५ कोटी
मंत्री दीपक केसरकर; आठवडा बाजार लवकरच पर्यायी जागेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः येथील आठवडा बाजार मोती तलावाच्या भोवती घेण्यात येत असल्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरच हा बाजार होळीचा खुंट परिसरात हलविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यातील साडेबारा कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री केसरकर यांनी पालिका पदाधिकारी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, राजन पोकळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह अधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा मंडईच्या पुनर्बांधणीसह स्थानिक व्यापाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरुपाच्या व्यवस्थेबाबत येथील पालिकेच्या सभागृहात रात्री उशिरा ही बैठक पार पडली. मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘संत गाडगेबाबा महाराज सावंतवाडीत आले होते. त्यांची या ठिकाणी सभा झाली होती. त्यांच्या स्मरणार्थ ही मंडई शहरात बांधली होती. नव्याने मंडई उभारण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५ कोटी रुपये मंजूर केले होते; परंतु ते खर्च झाले नव्हते. आता साडेबारा कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या कामासाठी एकूण २५ कोटी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी लागतील; मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी एकाचवेळी हा निधी दिला. त्यामुळे त्यांच्याच हस्ते याचे भूमिपूजन होणार आहे. या ठिकाणच्या व्यापारी वर्गाची तात्पुरती सुविधा कोठे करायची, या संदर्भातील बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सहकार्याची भूमिका व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे दोन ते तीन आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल.’’
...............
चौकट
पर्यायी जागा अशा...
येथील मोती तलावाचा काठ आठवडा बाजारामुळे विद्रुप दिसायला लागतो. मोती तलाव हे सावंतवाडीचे हृदय आहे. त्यामुळे तलाव विद्रुप होणे हे सावंतवाडीकरांना कधीही आवडणार नाही. यासाठी लवकरच येथील आठवडा बाजार होळीचा खुंट येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी मंडई विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात वसंत प्लाझा ते गोल्डन बेकरी, मॅंगो हॉटेल ते मच्छीमार्केट व कळसुलकर हायस्कूलपर्यंत बंदिस्त केलेल्या नाल्याचा भाग तसेच शाळा क्रमांक ३ च्या बाजूची पार्किंग जागा, स्टेट बँक व भांगले पेट्रोल पंप बाजूची पार्किंगची जागा या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.