
चिपळूण - गांधी आंबेडकर समन्वयातूनच विकास होईल
फोटो ओळी
-RATCHL१३८.JPG- KOP23L82574
चिपळूण ः महात्मा गांधी यांच्या रक्षा कलश समाधीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्मरणिका प्रकाशित करताना शेखर निकम, युवराज मोहिते, प्रशांत यादव, विनायक होमकळस, सावित्री होमकळस आदी.
गांधी आंबेडकर समन्वयातूनच विकास होईल
युवराज मोहिते : गांधींच्या रक्षा कलश समाधीला ७५ वर्षे पूर्ण, स्मरणिकेचे प्रकाशन
चिपळूण, ता. १३ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या समन्वयातूनच या देशाचा विकास होऊ शकतो. या दोन महामानवांनी एकमेकांचे व्यक्तित्व घडवले आहे. त्यांच्यातील केवळ मतभेदांचीच चर्चा केली जाते. त्यांनी एकमेकांना कसे समजून घेतले ते लक्षात घेतले जात नाही. बाबासाहेबांनी जेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा त्यांनी व्यासपीठावर केवळ गांधींचीच तसबीर लावली होती. काही लोकांना अजूनही गांधी समजात नाहीत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते युवराज मोहिते यांनी पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमात केले.
महात्मा गांधी यांची रक्षा कलश समाधी चिपळूण येथील गांधारेश्वराच्या निसर्गरम्य परिसरात आहे. या समाधीला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या वेळी आमदार शेखर निकम, प्रशांत यादव, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस म्हणाले, ‘या निधीतून भविष्यकाळात अधिकाधिक उपक्रम आयोजित करता येतील. विद्यार्थ्यांच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, नामवंतांची व्याख्याने, अभ्यास शिबिरे अशा विविध माध्यमातून गांधी विचार पोहचविला जाईल.’
डॉ. सुरेश जोशी म्हणाले, ‘गांधी हा निरंतर चिंतनाचा, अभ्यासाचा विषय आहे. देवरुखचे श्री. उपाध्ये यांनी अहिंसा या विषयावर एक लघुचित्रपट बनविला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक मिळाले आहे. आपल्या जिल्ह्यात गांधी प्रतिष्ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.’ श्री. यादव यांनी सांगितले, प्रा. होमकळस व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिष्ठानाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात महात्मा गांधीच्या विचारांचे कार्यक्रम होत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे.
परांजपे मोतीवाले हायस्कूलचे शिक्षक शिवाजी शिंदे व त्यांचे विद्यार्थी, सुरेश तांबट, विश्वास गुढेकर, अर्बन बँकेचे प्रतिनिधी संचालक सुनील खेडेकर, गांधारेश्वर देवस्थानाचे प्रतिनिधी, अरुण डाकवे, रमेश चिपळूणकर, शेख अली खडस, प्रकाश काणे यांचा ग्रंथभेट व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.