
इन्सुलीत आंबा, काजू कलमांना आग
82581
इन्सुली ः येथे आग लागून काजु कलमे खाक झाली.
इन्सुलीत आंबा, काजू कलमांना आग
शॉर्टसर्किटमुळे घटना; बागायतदारांचे लाखोंचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः इन्सुली-गावकरवाडी येथील तिलारी कॅनलच्या बाजूला असलेल्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. दरम्यान, महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही एकही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने बागायतदार प्रमोद केरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महावितरणची ३३ केव्ही लाईन येथून गेली आहे. या लाईनचा पोल हा श्री. केरकर यांच्या बागेच्या परिसरात आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठा आवाज होऊन आग लागली. या आगीत आंबा, काजूची बहरती कलम खाक होऊन सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यात नुकतीच मोहोरलेली आंबा २२, काजू ३५, सागवान २५ व कोकमची बागायत जळून खाक झाल्याने दीड - दोन वर्षांच्या मेहनतीनंतर बहरणारी कलमे जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त केली आहे. शेजारी राहणाऱ्या मयेकर यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. महावितरणचे बांदा, सावंतवाडी अधिकारी यांना फोन करून देखील अद्याप साधी चौकशी व पहाणी करण्यासाठी कुणीही न आल्याने तसेच कृषी सहाय्यकांचाही फोन बंद असल्याने बागायतदार केरकर यांसह ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काका मयेकर, प्रसाद मयेकर, सुलोचना मयेकर, आनंद चराटकर, योगेश केरकर यांनी आग अटोक्यात आणण्यास मदत केली.