
रत्नागिरी- पर्यटन परिषद
rat१४२६.txt
(टुडे पान २ साठी)
२७ फेब्रुवारीला शाश्वत पर्यटन परिषद
रत्नागिरी, ता. १४ ः गोव्याची सर्व अर्थव्यवस्था समुद्र आधारित पर्यटनावर चालते. रत्नागिरी जिल्ह्यातील विशाल व अथांग समुद्रकिनारे लाभले आहेत. मग येथेसुद्धा त्यावर आधारित शाश्वत पर्यटनातून विकास साधता येईल. या विषयावरच रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवासंस्थेने पाचवी रत्नागिरी जिल्हा शाश्वत पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मारूती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे होणार आहे, अशी माहिती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.
रत्नागिरीत सागरी पर्यटनातून जागतिक पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल, कोकणातील ग्रामीण लोककलेला वाव देणे व कोकणातील खाद्यपदार्थांची पर्यटकांमध्ये रूची निर्माण करणे आणि स्थानिकांमध्ये पर्यटनाविषयी जनजागृती करणे हा या परिषदेचा विषय आहे.
कोकणातील प्रमुख लोककला, खेळे, नमन, जाखडी, ढोलवादन, पालखीनृत्य या कलेला पर्यटकांच्या माध्यमातून प्रमुख पर्यटनस्थळांवर कायमस्वरूपी व्यासपीठ निर्माण करून देण्याची पर्यटन संस्थेने मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील लोककलाकारांना या माध्यमातून रोजगार निर्माण होईल.
परिषदेस उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, आमदार, खासदार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, सिंधुरत्न योजना सदस्य प्रमोद जठार आणि किरण सामंत, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, कोकण विभागचे हणमंत हेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
--
चौकट १
योजनांसाठी पाठपुरावा
अनेक पायाभूत सोयीसुविधाही शासनामार्फत मिळत आहेत. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याकडे वळू लागले आहेत. अनेक ट्रेनिंग कार्यक्रम प्रामुख्याने टुरिस्ट गाईड प्रोग्राम, विविध बँकांच्या माध्यमातून स्थानिकांना व्यवसाय उभारण्याकरिता कर्जासाठी मार्गदर्शन, शासकीय पर्यटन योजना मिळवून देण्य संदर्भात परिषदेत चर्चा होणार आहे.