
कर्मचारी पतपेढीतर्फे सभासद वारसास १० लाखाचा धनादेश
82690
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी कर्मचारी पतपेढीतर्फे मयत सभासदाच्या वारसास अपघाती विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कर्मचारी पतपेढीतर्फे सभासद
वारसास १० लाखाचा धनादेश
कुडाळ, ता. १४ ः सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय-निमशासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे सभासदाच्या वारसास अपघात विमांतर्गत दहा लाखाची मदत देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय-निमशासकीय सहकारी बँक कुडाळ ही संस्था स्थापनेपासून सर्व सभासदांचे हित सांभाळणारी व माणुसकी जपणारी संस्था आहे. संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद प्रत्येक सभासदाच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सुखदुःखात सहभागी होण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे यावेळी संस्थाध्यक्ष शरद नारकर म्हणाले. गेल्यावर्षीपासून संस्थेतील सर्व सभासदांसाठी संस्थेमार्फत मोफत ग्रुप अपघात विमा रक्कम संरक्षण १० लाख रुपये प्रति सभासदासाठी वार्षिक हप्ता ३५४ रुपये उतरविला होता. ही रक्कम संस्था नफ्यातून देत होती. संस्थेचे सभासद शिक्षक लक्ष्मण सुभाष राठोड यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये अपघाती निधन झाले. संस्थेने आणि त्यांची वारस पत्नी अनिता राठोड यांनी अपघाती विम्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संस्थेमार्फत दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून त्यांना १० लाख रुपये अपघाती विमा रक्कम मंजूर झाली. या रकमेचा धनादेश संस्थाध्यक्ष नारकर यांच्या हस्ते संस्थेच्या येथील मुख्य कार्यालयात अनिता राठोड यांना देण्यात आला. त्यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रसाद कुटे, महेश गावडे, उदय शिरोडकर, संजय बगळे, संजय गावडे, राजेश कुडाळकर, सुंदर म्हापणकर, मंगेश राऊत, आनंद परुळेकर, विनयश्री पेडणेकर, वसंतराव पाटोळे, दिलीप मसके, शीतल परुळेकर, विकास घाडीगावकर, नितीन जठार, सभासद संजय पाताडे, व्यवस्थापक रामचंद्र दळवी उपस्थित होते.