देवरूख ः बसस्थानकासमोरील ती अतिक्रमणे हटणार तरी कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः बसस्थानकासमोरील ती अतिक्रमणे हटणार तरी कधी
देवरूख ः बसस्थानकासमोरील ती अतिक्रमणे हटणार तरी कधी

देवरूख ः बसस्थानकासमोरील ती अतिक्रमणे हटणार तरी कधी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१४p१०.jpg ः KOP२३L८२६५५
देवरूख ः बसस्थानकासमोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.
---------------
देवरूख बसस्थानकासमोरची अतिक्रमणे हटणार कधी?
पादचारी, वाहनचालक त्रस्त ; व्यापाऱ्यांचा विरोध पथ्यावर
देवरूख, ता. १४ ः राज्य परिवहन महामंडळाच्या देवरूख आगारातील नव्या बसस्थानकासमोर असलेली अतिक्रमणे हटणार तरी कधी, असा सवाल पादचारी आणि वाहनचालक उपस्थित करत आहेत. याचा फटका वाहतुकीला बसत नसला तरी या अतिक्रमणामुळे पार्किंगच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बसस्थानकावर असलेल्या आयडीबीआय बॅंकेसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. याच पार्किंगला जाण्यासाठी जो प्रवेश आहे त्याच ठिकाणी भाजीवाले, मासेविक्रेते दिवसभर ठाण मांडून बसतात. एखाद्याला पार्किंग करायचे असल्यास संबंधित विक्रेत्यांना बाजूला होणास सांगितले तर अर्वाच्च भाषेत उत्तरे दिली जातात. हा प्रकार आजचाच नसून गेले वर्षभर सुरू आहे. समजा एखाद्याने बाजूने आतमध्ये वाहन पार्किंग केल्यास बाहेर काढतानाही असाच प्रकार घडतो. त्यामुळे ही जागा नक्की कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसुपते यांनी गतवर्षी नव्याने कार्यभार हाती घेतल्यानंतर बाजारातून अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेतली होती. या वेळी हे अतिक्रमण हटवण्यात आले होते; मात्र अवघ्या ७२ तासात पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती झाली ती आजपर्यंत कायम आहे. या मोहिमेला शहरातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे नगरपंचायतीला नमते धोरण घ्यावे लागले होते याचाच गैरफायदा या अतिक्रमणवाल्यांनी घेतला आहे. आधीच शहरात पार्किंगला कुठेही जागा नाही. त्यात बसस्थानकात असलेली ही जागा पुढील अतिक्रमणामुळे वापरता येत नाही. बाजारात कुठेही पार्किंग केल्यास पोलिस कारवाई करतात मग वाहनचालकांनी नक्की करायचे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवरुखचे कार्यक्षम मुख्याधिकारी विसुपते यांनीच आता या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.

चौकट
व्यापारीही हैराण
बसस्थानकासमोरील या अतिक्रमणाचा फटका केवळ बाजारातील व्यापाऱ्यांना किंवा वाहनचालकांना बसतोय असे नाही तर स्थानकावरील व्यापारीही यामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे पार्किंगला जागा नसल्याने नाइलाजाने पुढे जात आहेत.