
दाभोळ ःआंजर्ले आरोग्य केंद्राच्या दारातील प्रसुती गाजली
आंजर्ले आरोग्य केंद्राच्या दारातील प्रसुती गाजली
दापोलीची आमसभा ; उपचाराअभावी झाला बालकाचा मृत्यू
दाभोळ, ता. १४ ः पंचायत समिती दापोलीची काल झालेली आमसभा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कारभारावरून वादळी ठरली. आमदार योगेश कदम यांनी तालुका आरोग्ययंत्रणेला चांगलेच फैलावर घेतले. आंजर्ले आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची झालेली प्रसूती व उपचाराअभावी झालेला बालकाचा मृत्यू हा अत्यंत महत्वाचा विषय होता.
मुर्डी-चाचवलवाडी येथील एक महिला ३० नोव्हेंबर २२ ला प्रसुतीसाठी आंजर्ले प्राथमिक आरोग्यकेंद्रात आली होती. त्यादिवशी रविवार असल्याने आरोग्य केंद्र बंद होते. या केंद्राच्या दारातच या महिलेची प्रसूती झाली; मात्र त्याची दखल आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. प्रसुतीनंतर बालकासह या महिलेला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणताना नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी आमसभेत दिली. हा सगळा धक्कादायक प्रकार ऐकल्यावर उपस्थित सर्व अधिकारी व नागरिक अवाक् झाले. या सगळ्या दुर्दैवी प्रकाराची दखल आमदार योगेश कदम यांनी घेतली. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्यांनी हजेरी घेतली व या विषयात जो जबाबदार आहे त्याला आपण सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हा विषय आपण विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचा अहवाल तातडीने द्यावा, असे आदेशही त्यांनी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिला आहे.
आमसभेला उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी दिघे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्यासह खातेप्रमुख व विविध ग्रामपंचायतीचे सरपंच व नागरिक उपस्थित होते.
बांधकामाचा विषयही गाजला
आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचा विषयही चांगला गाजला. गेली चार वर्षे या इमारतीचे बांधकाम कूर्म गतीने सुरू असल्याची तक्रार आंजर्ले येथील नागरिकांनी केल्यावर आमदार योगेश कदम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची हजेरी घेतली. आम्ही आरोग्यकेंद्र्यांच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळवायचा; मात्र ठेकेदार संथगतीने काम करत असेल तर तुम्ही काय करता? असा प्रश्न आमदार कदम यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना विचारला. या ठेकेदाराला नोटीस दिली की नाही, याचीही माहिती कदम यांनी घेतली व एका महिन्यात मला या बांधकामाची प्रगती दिसली पाहिजे, असेही सुनावले.\