
साडवली-डी कॅडमध्ये 19 पासून वार्षिक कला महोत्सव
डी कॅडमध्ये रविवारपासून कला महोत्सव
स्थापत्यकला विषय ; अनमोल ठेवा कलारसिकांसमोर आणणार
साडवली, ता.१५ ः कोकण स्थापत्यकला हा विषय घेऊन देवरूख डी-कॅड कला महाविद्यालय आपला संकल्पन २०२३ हा वार्षिक कला महोत्सव १९ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (ता.१९) सायंकाळी चार वाजता सह्याद्री स्कूल ऑफ सावर्डेचे ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, अध्यक्ष प्रकाश राजेशिर्के यांच्या हस्ते होणार आहे.
संकल्पन २०२३ हे कला प्रदर्शन कोकण स्थापत्य विषयाला वाहिलेले आहे. विद्यार्थ्यांनी या कलेची मांडणी केलेली आहे. पश्चिम घाटापासून पश्चिम समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण पसरलेली भूभागाची एक पट्टी म्हणजे कोकण होय. कोकणाला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातवाहन, चालुक्य इत्यादींसारख्या प्रभावी राज्यकर्त्यांनी कोकणाला समृद्ध वारसा दिला. हा स्थापत्यकलेचा वारसा कोकणात ठिकठिकाणी सापडलेल्या तत्कालीन अवशेषांवरून आपल्यासमोर येतो. त्यात बहुतांश संदर्भ आपल्या कोकणातील मंदिरामध्ये आढळतात. कर्णेश्वर-कसबा, काशीविश्वेश्वर-पावस, सोमेश्वर-राजवाडी, कानकादित्य-कशेळी असे एक दोन नव्हे तर असंख्य कोकणी स्थापत्यकलेचे अजोड नमुने आहेत.
स्थापत्य रचनांचा ठेवा कलात्मक गुणधर्मांसहित आपला गौरवशाली कलेचा वारसा कलारसिकांसमोर आणण्याचा डी-कॅडचा हा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे आर्ट गॅलरीत पाहता येतील. १८ व १९ तारखेला खुला गट किल्ले स्पर्धा होणार आहेत. २१ला सकाळी १० वा. प्रा. अवधुत पोटफोडे हे वस्तुचित्रण या विषयाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना कलारसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष अजय पित्रे, प्राचार्य रणजित मराठे, विद्यार्थी प्रतिनिधी निरंजन सागवेकर, तेजल भाटकर यांनी केले आहे.