
रुग्णालयातील समस्या मार्गी लावू
82926
सावंतवाडी ः डॉ. नागरगोजे यांना निवेदन देताना ‘सामाजिक बांधिलकी’चे कार्यकर्ते.
रुग्णालयातील समस्या मार्गी लावू
डॉ. नागरगोजे ः ‘सामाजिक बांधिलकी’ने सावंतवाडीप्रश्नी वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. बी. एस. नागरगोजे यांना ‘सामाजिक बांधिलकी’च्या माध्यमातून निवेदन दिले. रुग्णालयाच्या समस्या मार्गी लावण्याबरोबरच सोनोग्राफी मशिनसह तंत्रज्ञ लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही डॉ. नागरगोजे यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ''सामाजिक बांधिलकी''द्वारे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. रुग्णालय व रुग्णांच्या सेवेसाठी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर व ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव सातत्याने रुग्णालयाच्या संपर्कात राहून विविध समस्यांच्या निरसनासाठी प्रयत्न करतात. या निवेदनातून विविध समस्यांकडे त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले. अपघात विभागाच्या परिसरात रुग्णांचे नातेवाईक दुचाकी, मोटारी उभ्या करून जातात. त्याचा परिणाम गंभीर पेशंट रुग्णालयात घेऊन येताना या वाहनांचा रुग्णवाहिकेला अडथळा होतो. त्यामुळे रुग्णवाहिका काही काळ रस्त्यावरच थांबावावी लागते. त्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नेमावा, अशी मागणी होती. रुग्णालयाच्या औषध भंडारामध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना महागडी औषधे बाहेरून घ्यावी लागतात. ती त्यांना परवडत नाहीत. यासाठी योग्यरित्या औषधांचा पुरवठा व्हावा. शवागृहामधील लिकेज असलेले नळ व फुटलेले टॉयलेट तातडीने बदलण्यात यावे. रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावा. रुग्णांना गरम व शुद्ध पाणी मिळण्यासाठी वॉटर फिल्टर मशिन बसवावी. रग्णालयातील दोन जनरेटरच्या देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही डॉ. नागरगोजे यांनी दिली. याबद्दल त्यांचे राजू मसूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खलील, अॅड. अशोक पेडणेकर, हेलन निब्रे, प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार यांनी आभार मानले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दुर्भाटकर, डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत आदी उपस्थित होते.
...................
चौकट
ओपीडीची वेळ बदलण्याची मागणी
ओपीडीची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. ही वेळ वाढवून सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.