लमाण बांधवांचा तांडा थिरकला डिजेच्या तालावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लमाण बांधवांचा तांडा थिरकला डिजेच्या तालावर
लमाण बांधवांचा तांडा थिरकला डिजेच्या तालावर

लमाण बांधवांचा तांडा थिरकला डिजेच्या तालावर

sakal_logo
By

82943
वैभववाडी ः संत सेवालाल महाराज उत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत पुरूषांसोबत महिलांनी देखील हात उंचावून ताल धरला.

लमाण बांधवांचा तांडा थिरकला डिजेच्या तालावर

वैभववाडी बाजारपेठेतील चित्र; उत्सावाच्या निमित्ताने दैनंदिन कामाचा ताण दूर

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः दगड-मातीच्या विश्वात पोटासाठी रमणारा ‘लमाण्याचा तांडा’ आज येथील बाजारपेठेत डिजेच्या तालावर थिरकला. महिलांनी देखील त्यामध्ये चांगलाच फेर धरला. इतर वेळी दगड फोडणे, खडी पसरविणे, खोदकाम करण्यात दंग असणारा हा समाज आज नाचताना पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.
पोहरादेवीचा उत्सव आणि संत सेवालाल महाराजांची २८४ ची जयंती उत्सव सर्व राज्यभरात आज साजरी केला जात आहे. शहरात देखील या उत्सवाची काहीशी झलक लमाण बांधवामुळे येथील लोकांना पाहायला मिळाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक लमाण बांधव पावसाळा संपला कि रोजीरोटीसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. नोव्हेंबर ते जूनअखेरपर्यत हाताला मिळेल ते काम करायचे आणि साठवलेली पुंजी घेऊन पुन्हा घर गाठायचे, हा त्यांचा वर्षाचा नित्यक्रम ठरला आहे. काळा दगड फोडणे, रस्ते खडीकरण, डांबरीकरण करणे, विहीरी खोदणे, चर खोदणे, स्लॅब घालणे, क्रशर, चिरेखाणी, वाळुच्या खाणीवर देखील काम करणारांची संख्या देखील मोठी आहे. यासह विविध शेकडो कामे या समाजातील पुरूष आणि महिला मंडळी करीत असतात.
‘हार्डवर्कर’ म्हणून या समाजाकडे पाहिले जाते. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि सायंकाळी ज्या ठिकाणी तंबू ठोकलेले असतील, त्या ठिकाणी वस्तीला जायचे, एवढाच या लोकांचा दिनक्रम ठरलेला असतो. आठवडा बाजारदिवशी मुकादमाकडे खर्चीपुरता (खर्च) रक्कम घ्यायची आणि आठवड्याचा बाजार हे लोक करतात. जिल्ह्यातील आठवडा बाजारात मोठी गर्दी या लोकांची पाहायला मिळते. होळी सण ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांना नाच करून त्यांच्याकडून खुशी म्हणजेच पैसे मागितले जातात.
एरव्ही हा संपूर्ण समाज आपल्या कामात मग्न असतो. परंतु, आज सकाळी अकरा वाजता फटाक्याची आतषबाजी आणि डिजेचा आवाज शहरात घुमु लागला. नियोजीत कोणताच कार्यक्रम नसल्यामुळे नेमका काय कार्यक्रम आहे, म्हणून लोकांचे डोळे अ. रा. विद्यालयाच्या दिशेने लागले. त्याचवेळी समोरून डिजेच्या तालावर थिरकणारा लमाण्यांचा तांडा दिसला. संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली होती. हात उंच करून महिला, पुरूष डिजेच्या तालावर नाचत होते. हे पाहुन अनेकांचे डोळे विस्फारले. ही मिरवणुक दत्तमंदीर परिसरातून पुन्हा अ. रा. विद्यालयाकडे नेण्यात आली. महिला वर्ग तर तहानभान विसरून नाचत होत्या. दैनंदिन कामाचा ताण देखील नाचण्याच्या आनंदात विसरून गेल्या होत्या.
-------------
चौकट
भावना व्यक्त करणारा नजारा
शोषित, पिडीत, कष्टकरी समाजातील या वर्गाला इतर उच्चविभूषीत वर्गाप्रमाणे भावना आहेत. त्यांना देखील कधीतरी मनासारखे वागावे, कधी नाचावे, गावे असे वाटते. लमाणांचा हा कार्यक्रम काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाच्या भावना व्यक्त होणारा होता असेच म्हणावे लागेल.
-----------
कोट
पोहरादेवीचा उत्सव आणि सेवालाल महाराज जयंती महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. आमच्या गावाकडे देखील हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला जातो; परंतु, बहुतांशी तेथील येथे कामानिमित्त असल्यामुळे सर्वानी मिळून हा उत्सव येथे साजरा केला.
- खेरू बसु पवार, मुकादम, लमाण कामगार
----------
कोट
कामानिमित्त सर्वच कोकणात आलो आहोत. गावाकडे जाऊन कार्यक्रम करणे शक्य नसल्यामुळे एक दिवस येथेच आनंदात उत्सव साजरा केला. हा उत्सव आमच्यासाठी पुढील वर्षासाठी शक्ती ठरणार आहे.
- अप्पु लेखु राठोड, मुकादम, लमाण कामगार