परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा

परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा

Published on

swt162.jpg
83135
कुडाळः कार्यशाळेचे उद्घाटन करताना मानसी धुरी. सोबत काटकर, प्रशांत सातपुते, काळे, आनंद पवार आदी.

परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा
आनंद पवारः कुडाळमध्ये लिंग समभाव सचेतना कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले, तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे. मुळात भेदभाव, असमानता या शब्दांचा अर्थ आपल्या घरात होणाऱ्या घडामोडींमधूनच शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून सुरू होते, असे मत सम्यक संस्थेचे आणि पुरुष मास्टर ट्रेनर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी येथे व्यक्त केले.
येथील दुर्वांकुर हॉल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पुरुष मास्टर ट्रेनर अशी लिंग समभाव सचेतना कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा तीन दिवसांची आहे. उद्घाटन प्रसंगी महिला बाल विकास विभागाचे काटकर, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे काळे, मार्गदर्शक आनंद पवार, संस्थेच्या अध्यक्षा मानसी धुरी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोगिनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यशाळेचे मार्गदर्शक पवार म्हणाले, ‘‘लिंग समभाव सचेतना कार्यशाळा का घ्यावी लागली, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे, महिला विविध मार्गातून प्रगती करत आहेत. नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा प्रमुख ठिकाणी त्या काम करत आहेत, हे परिवर्तन झाले; पण मानसिक स्थितीतून परिवर्तन झाले आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. लिंग समभाव सचेतना ही कार्यशाळा त्यासाठीच आहे. आपण सर्व समान आहोत. जशा पुरुषाला भावना आहेत, अशा महिलेलाही आहेत आणि एकामेकांच्या भावना जपणे, एकामेकाला सहकार्य करून प्रगती करणे, म्हणजेच लिंग समभाव होय; मात्र अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा आपण दिंडोरा पिटत आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार देण्यात आला आहे. भेदभाव आणि असमानता याचे अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे. त्यावेळीच समानता आणि समभाव नांदू शकतो.’’
माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, "पुरुष आणि स्त्री हा नैसर्गिक लिंग भेद असला तरी समभाव निर्माण करणे हे आपल्या हाती आहे. तसाच तिसरा वर्ग हा तृतीयपंथी आहे. त्यांच्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. समाजात अजूनही पुरुषी अहंकार असून तो कमी झाला पाहिजे. ''समाज काय म्हणेल'' या वाक्याने सर्वांच्या जीवनाची राखरांगोळी झाली आहे. समाज काय म्हणेल, यापेक्षा आपण काय करतो, याकडे लक्ष देणे आणि त्याची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. संस्काराचे कारण पुढे करून अनेक जुन्या रुढी, परंपरा अंगीकारल्या जात आहेत किंवा त्या लादल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. समाजामध्ये परिवर्तन झाले पाहिजे." महिला बाल विकास विभागाचे काटकर यांनी महिलांसाठी अनेक कायदे आहेत आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळू शकतो. त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम शासन हाती घेत आहे. महिलांचा जेव्हा सर्वांगीण विकास होईल, तेव्हाच मानवी निर्देशांक वाढेल, असे सांगितले. प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे काळे यांनी केले. या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सुमारे ३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com