
काजुपिकाला वादळी वाऱ्याचा तडाखा
swt१६८.jpg
८३१६१
अरुळेः येथील शैला कांदळगावकर यांच्या काजू बागेचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले.
swt१६९.jpg
८३१६२
अरुळेः जोरदार वाऱ्यामुळे काही झाडे देखील मोडून पडली आहेत
काजुला वादळी वाऱ्याचा तडाखा
सिंधुदुर्गातील स्थितीः बियांसह झाडे मोडून पडल्याने बागांचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ः जिल्ह्यात काही भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा उत्पादन सुरू झालेल्या काजू पिकाला तडाखा बसला आहे. काजू बीसह काही ठिकाणी काजूची झाडे देखील उन्मळून पडली आहेत. डोंगरपायथ्याशी असलेल्या गावातील काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे नुकसान होण्याचा गेल्या पंधरा दिवसांतील दुसरा प्रकार आहे.
जिल्ह्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहे. जिल्ह्यातील पूर्वपट्टयातील डोंगरपायथ्यांशी असलेल्या गावांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून तर पहाटेच्या वेळेत जोरदार वारे वाहत आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे काजू पिकाचे मोठे नुकसान होत आहे. काही भागात काजूचे नुकतेच उत्पादन सुरू झाले आहे. तर काही भागात कोवळी बी झाडांवर आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोवळी बी गळून पडली आहे. याशिवाय मोहोर देखील गळून पडला आहे. एवढेच नव्हे तर ज्या भागात वादळीवारे झाले, त्या भागातील काजूची झाडे देखील उन्मळून, मोडून पडली आहेत.
वैभववाडी तालुक्यातील करुळ, नावळे, खांबाळे, आर्चिणे, अरुळे, निमअरुळे, सांगुळवाडी, कुंभवडे, भुईबावडा, ऐनारी, सडुरे या गावांतील काजू बागांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय कणकवली तालुक्यातील फोंडा, घोणसरी, हरकुळ, नाटळ, भिरवंडे या भागात देखील मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी ३ आणि ५ फेब्रुवारी या कालावधीत देखील जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यात काजू पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्यामुळे काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सततच्या वाऱ्यामुळे काजू बागायतदार संकटात सापडला आहे.
चौकट
नुकसानीचे पंचनामे करा
वादळी वाऱ्यामुळे काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या तडाख्याचा काजू पीक उत्पादनावर विपरित परिणाम होणार असून काजूचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी काजू बागायतदारांकडून केली जात आहे. विमा कंपनीने देखील याची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कोट
माझी काजूची तीनशे झाडे आहेत. ही झाडे डोंगरभागात असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे काजू बी, मोहोर गळून पडला आहे. हंगाम सुरू होतानाच हा तडाखा बसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- महेश रावराणे, काजू उत्पादक शेतकरी, नावळे