
मच्छीविक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह
rat१६३९.txt
बातमी क्र..३९ (पान ३ साठी)
मच्छीविक्री करणाऱ्या
महिलेचा मृतदेह सापडला
तोंडावर जखम ; घातपाताचा संशय
संगमेश्वर, ता. १६ ः तालुक्यातील डिंगणी-करजुवे मार्गावर मच्छीविक्री करणाऱ्या एका महिलेचा मृतदेह जंगल परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
डिंगणी-करजुवे, पिरंदवणे अशा ४-५ गावांमध्ये ही महिला मच्छी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे; मात्र बुधवारी (ता. १५) त्या घरातून सकाळी मच्छीविक्रीसाठी बाहेर पडल्या; मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करत असताना डिंगणी-करजुवे रोडवर त्यांची माशांची टोपली पडलेली दिसली. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता रस्त्याच्या बाहेर जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. जवळपास ३०- ४० फुटांवर ओढत नेऊन हा मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला होता. तिच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार झाल्याने चेहरा ओळखता येणे मुश्किल झाले होते. नातेवाइकांनी याची माहिती संगमेश्वर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे बोलले जात आहे; मात्र अपघात असेल तर तोंडावर प्रहार कसला? आणि मृतदेह ४० फूट आत का नेण्यात आला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आल्यावरच याचा उलगडा होणार आहे. दरम्यान, डिंगणी-करजुवे परिसरात चिरा आणि वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. रस्त्याला वर्दळ कमी असल्याने हे चालक बेदरकारपणे वाहने चालवतात. यातून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून हा अपघात किंवा घातपात झाला असावा, असा संशय आहे.
---