
विद्यार्थ्यांनो, संशोधनवृत्ती वाढवा
83281
मालवण ः राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
विद्यार्थ्यांनो, संशोधनवृत्ती वाढवा
डॉ. डी. के. कांबळे ः सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
मालवण, ता. १६ : सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. जगभरात शैक्षणिक दृष्टीकोनातून विविध प्रयोग होत आहेत. भारतातही शैक्षणिकदृष्ट्या नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढविणे गरजेचे आहे, असे मत नॅक बंगलोरचे सहसल्लागार डॉ. डी. के. कांबळे यांनी येथे व्यक्त केले.
येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या भूगोल विभागांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व कोकण जिओग्राफर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटनातील नवप्रवाह अर्थात रिसेंट ट्रेंड्स इन टुरिझम’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सिंधुदुर्ग महाविद्यालयात केले आहे. उद्घाटनावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीपाद पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, डॉ. शशिकांत झाटये, डॉ. राजाराम पाटील, डॉ. आर. एन. काटकर व अन्य प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. झाटये यांनी, जगात ज्या गोष्टी नाहीत, त्या गोष्टी भारतात आहेत; परंतु त्यांचा योग्य पद्धतीने प्रसार व उपयोग होत नाही. त्यामुळे भारतातील प्रसिद्ध गोष्टींचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. एमपीएसी, यूपीएससी या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विविध पुस्तकांची गरज असते. सध्या एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयाच्या अनुषंगाने कोकणातील प्राध्यापक वर्गाने पुस्तक तयार करावे. ज्याचा उपयोग विद्यार्थी वर्गासाठी होईल, असे तहसीलदार पाटील म्हणाले. संस्थेचे कार्याध्यक्ष पंतवालावलकर यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने अपडेट राहण्याची गरज व्यक्त केली. यावेळी नॅक बँगलोरचे सहसल्लागार डॉ. कांबळे, तहसीलदार पाटील यांच्यासह डॉ. सनलकुमार (केरळ), डॉ. समीर बुटाला (पोलादपूर), डॉ. दीपाली गडकरी (मुंबई), डॉ. हेमंत पेडणेकर (मुंबई), डॉ. एस. बी. गायकवाड (मिरज), डॉ. नंदकुमार सावंत (गोवा), डॉ. दीपक कोल्हापुरे (कर्नाटक), डॉ. सुशील दलाल (हरियाणा) आदी संशोधकांना सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य व राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करणारे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांना कोकण जिओग्राफर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने ‘जीवनगौरव’ सन्मान तहसीलदार पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने नेहमीच कार्यरत असणारा महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रीतम गावडे यांनाही विशेष सन्मानित केले. प्रा. बी. एच. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुमेधा नाईक यांनी आभार मानले.