
शिविगाळ, मारहाण प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
शिविगाळ, मारहाण प्रकरणी
संशयिताची निर्दोष मुक्तता
ओरोस, ता. १७ ः ओरोस-बोरभाटवाडी येथील श्रीकृष्ण उर्फ आनंद दत्ताराम मुंज यांनी तेथीलच रहिवासी सागर रामचंद्र मुंज व इतर चौघांना शिविगाळ करून फावड्याने मारहाण केल्याच्या आरोपावरून ओरोस पोलिस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी संशयित मुंज यांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे अॅड. अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. स्वप्ना सामंत, सुनील मालवणकर यांनी काम पाहिले.
या गुन्ह्यातील फिर्यादी सागर रामचंद्र मुंज व संशयित श्रीकृष्ण मुंज हे नात्याने काका व पुतण्या असून त्यांचे सामायिक जमिनीच्या वाटपावरून वाद आहेत. ७ डिसेंबर २०२० ला रात्री साडेआठला सागर मुंज यांचे काका दिलीप मुंज यांचा टेम्पो फिर्यादीच्या हिश्यातील जमिनीच्या रस्त्यावरून जात असताना बंद पडला होता. त्यावेळी सागर यांच्या काकांनी मेकॅनिकला बोलावले; परंतु मेकॅनिक न आल्याने तो टेम्पो बंद स्थितीत तेथेच राहिला. त्यानंतर रात्री साडेनऊला संशयित श्रीकृष्ण मुंज हे मातीने भरलेला डंपर (एमएच ७ सी ६१४७) घेऊन तेथे आला. त्यावेळी रस्त्यावर दिलीप मुंज यांची टेम्पो रिक्षा बंद पडलेली असल्याने संशयित श्रीकृष्ण याने डंपरमधून खाली उतरून दिलीप मुंज यांच्याशी वाद घातला. त्यावेळी सागर व त्याचा भाऊ समीर मुंज हे दिलीप यांना सोडविण्यासाठी गेले असता संशयिताने त्यांना धक्काबुक्की केली. शेजारी राहणाऱ्या सीताराम मुंज यांच्या घरातून फावडे घेऊन दिलीप मुंज यांना मारण्यासाठी आला. तसेच फिर्यादी सागर यांच्या हातावर लोखंडी फावडे मारून किरकोळ दुखापत केली. दिलीप मुंज यांचा मुलगा विनित हा सोडविण्यास गेला असता त्यालाही शिविगाळ करून धमकी दिली. त्या झटपटीत फिर्यादी सागर यांची २६ ग्रॅमची सोन्याची चैन, गणपतीचे लॉकेट व १०,००० रुपये गहाळ झाले, अशा आशयाची फीर्याद दाखल होती. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्ष संशयिताविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल, इथपर्यंत पुरावा देऊ न शकल्याने त्याची निर्दोष मुक्तता केली.
--
मारहाण प्रकरणी चौघांची
पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
ओरोस, ता. १७ ः मारहाण प्रकरणी संशयित सागर रामचंद्र मुंज, समीर रामचंद्र मुंज, दिलीप अनंत मुंज, विनित दिलीप मुंज (रा. ओरोस बोरभाटवाडी) यांची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
सागर मुंज, समीर मुंज, दिलीप मुंज, विनित मुंज व तेथीलच श्रीकृष्ण मुंज यांच्यात जमिनीच्या वाटपावरून वाद आहे. ७ डिसेंबर २०२० ला संशयित घरी जात असताना त्यांचा टेम्पो रस्त्यात उभा होता. त्यावेळी श्रीकृष्ण मुंज हे त्याच रस्त्यावरून डंपर घेऊन जात होते. यावेळी त्यांना डंपर नेण्यास जागा नाही, म्हणून एक रिक्षा बाजूला घेण्यासाठी मदतीसाठी गेले. यावेळी संशयितांनी श्रीकृष्ण मुंज यांना शिविगाळ करून मारहाण केली. त्यामुळे ते तेथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार ओरोस पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासले. जबाबातील विसंगती, प्रत्यक्षदर्शी घटनेचा एकही साक्षीदार नाही व सबळ पुरावा कोर्टासमोर न आल्याने संशयितांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे अॅड. गौरव पडते, अॅड. अपर्णा सामंत, अॅड. स्वप्नाली गावडे, अॅड. द्रौपदी धुरी यांनी काम पाहिले.