रत्नागिरी-क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम पट्टा
रत्नागिरी-क्राईम पट्टा

रत्नागिरी-क्राईम पट्टा

sakal_logo
By

चरवेलीत टेम्पो-टॅंकरचा अपघात
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील चरवेली येथे टेम्पो व टॅंकरची धडक झाली. टेम्पोचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सुशांत रामचंद्र गरंडे (वय २१, रा. मिरज, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास चरवेली रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत शंकर यादव (वय ५५, रा. कासार शिरंगे, कराड) हे टॅंकर (एमएच-१०-सीआर-९६७९) घेऊन जयगड ते सांगली असे जात होते. त्याचवेळी संशयित सुशांत गरंडे हा टेम्पो (एमएच-४५-एएफ-५६२३) घेऊन समोरून येत असताना चरवेली येथे त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला व रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येऊन समोरून येणाऱ्या संपत यादव यांच्या टॅंकरला उजव्या बाजूने ठोकर देत अपघात केला. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संपत यादव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.


मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून सुमारे १६ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल दत्ताराम कांबळे (वय ३०, रा. मिरजोळे-लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१६) सकाळी सव्वाआठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टी दारूअड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मिरजोळे नदीकिनारी झाडीझुपाच्या भागात नवसागरमिश्रित कुजके रसायन, पत्र्याचे बॅरल, प्लास्टिकचा कॅन, अॅल्युमिनियमची डेग, प्लास्टिक बॅरल असा एकूण १६ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

गिम्हवणेत २ लाख ४० हजारांची चोरी
दाभोळ ः दापोली शहराजवळील गिम्हवणे गणेशनगर येथील एका घरातून २ लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गिम्हवणे गणेशनगर येथील रहिवासी ज्योती संजय सावंत यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये दागिने ठेवले होते व लॉकरची चावी कपाटातच ठेवली होती १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यानच्या काळात १ लाख ८० हजाराचे मंगळसूत्र व ६० हजाराचे मंगळसूत्र असा सुमारे २ लाख ४० हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सावंत यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.

गावठी दारूची विक्री, महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-भंडारवाडा येथे विनापरवाना गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयन महादेव खेऊर (वय ४७, रा. मालगुंड-भंडारवाडा,रत्नागिरी ) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. १६) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित महिलेकडे ८८० रुपयांची गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत लोहळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अंमलदार करत आहेत.