गव्याच्या हल्ल्यात एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्याच्या हल्ल्यात एक जखमी
गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

sakal_logo
By

गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

पेंडूरमधील घटना; दशक्रोशीत भीतीचे वातावरण

ओरोस, ता. १८ ः पेंडूर-खरारेवाडी (ता.मालवण) येथे गव्यांचा उपद्रव वाढला आहे. येथील रस्त्याने येत असलेल्या बाबा गाळवकर यांच्यावर एका गव्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. या घटनेने येथील दशक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात गवा रेडे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी ते कळपाने तर काही ठिकाणी एखादा गवा रेडा फिरताना दिसत आहे. त्यांच्याकडून शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी ते थेट वस्तीत घुसल्याचे नागरिकांनी पाहिले आहेत. यातील काही रेड्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याचा घटना घडल्या आहेत. तसाच प्रकार गुरुवारी (ता.१६) रात्री पेंडूर खरारेवाडी येथे घडला आहे. कट्टा पेंडूर मार्गे होबळीचा माळ या रस्त्यावरील पेंडूर खरारेवाडीकडे जाण्यासाठी खांदी या ठिकाणाहून रस्ता जातो. त्या रस्त्याने खरारेवाडी येथील गाळवकर हे रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान जात असताना त्यांच्यावर गव्याने हल्ला केला. सुदैवाने गाळवकर यांना यात दुखापत झाली.
-----------
चौकट
पालकमंत्र्यांचा गाव
जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पेंडूर खरारेवाडी हा गाव आहे. त्यामुळे येथील महेश सावंत यांनी त्यांना पत्र पाठवत याबाबत जाणीव करून दिली आहे. कायद्याने वन्य प्राणी मारण्यास बंदी आहे. त्यामुळे नागरिक अशा आक्रमक झालेल्या गवा रेड्याचा बंदोबस्त करू शकत नाहीत. आपण या गावातील रहिवासी आहात. अशाप्रकारे गवा रेडा हल्ला करू लागल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण शासन पातळीवर याचा निर्णय घेऊन याबाबत बंदोबस्त करावा. अशाप्रकारे वन्य प्राण्यांचे पुन्हा हल्ले होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी केली.