पान एक-बंगालप्रमाणे महाराष्‍ट्राच्या भावनेशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-बंगालप्रमाणे महाराष्‍ट्राच्या भावनेशी खेळ
पान एक-बंगालप्रमाणे महाराष्‍ट्राच्या भावनेशी खेळ

पान एक-बंगालप्रमाणे महाराष्‍ट्राच्या भावनेशी खेळ

sakal_logo
By

83628
कणकवली ः येथील पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत. बाजूला वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत आदी.

बंगालप्रमाणे महाराष्‍ट्राच्या भावनेशी खेळ
संजय राऊत; निवडणूक निकालातून जनतेची चीड दिसेल
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८ ः दिल्‍लीतील शक्‍तींनी पश्‍चिम बंगालच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यावेळी तेथील जनतेने निवडणूक निकालातून चीड व्यक्‍त केली. दिल्‍लीश्‍वरांना त्‍यांची जागा दाखवून दिली. बंगालप्रमाणेच आता महाराष्‍ट्राच्या भावनेशीही खेळ सुरू आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्रातही पश्‍चिम बंगालच्या धर्तीवर निकाल दिसतील, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले.
शिवसेना संपविण्यासाठी संपूर्ण राज्‍यासकट काम करतोय. राष्‍ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या अखत्‍यारित येणारे निवडणूक आयोग, राज्‍यपाल आणि इतर यंत्रणा तसेच न्यायव्यवस्थेतही कळसूत्री बाहुल्‍या घटनात्मक पदावर नेमून आपल्‍याला हवे तसे निर्णय घेतले जात आहेत. देशाला अपेक्षित नव्हे तर दिल्‍लीतील नेत्‍यांना हवे त्‍याप्रमाणे निर्णय घेतले जात असल्‍याने लोकशाही शिल्‍लक राहिलेली नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्‍त केली.
श्री. राऊत म्‍हणाले, ‘‘चिन्ह आणि पक्ष मिंधे गटाला मिळाला म्‍हणून शिवसेना त्‍यांची झाली असे कधीच होणार नाही. तुम्‍ही कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्‍न केलात तरी शिंदे गटरूपी रावण शिवसेनेचे धनुष्यबाण पेलू शकणार नाही. उलट तोच धनुष्यबाण तुमच्या छाताडावर पडल्‍याशिवाय राहणार नाही. आज एका पक्षातील सर्वाधिक आमदार आणि खासदार आमिष दाखवून फोडले जातात. त्‍यानंतर त्‍या आमदार आणि खासदारांना मिळालेल्‍या मतांची आकडेवारी करून संपूर्ण पक्षच त्‍यांच्या नावावर केला जातो, हे सर्व घटनेच्या विरोधात आहे. आज शिवसेनेवर आलेली वेळ उद्या इतर पक्षांवर येऊ शकते. त्‍यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी राजकीय पक्ष म्‍हणजे काय ते नेमके स्पष्‍ट करा, असा जाब निवडणूक आयोगाला विचारण्याची गरज आहे.’’
राऊत म्‍हणाले, ‘‘आयोगाच्या निर्णयाने आम्‍हाला वेदना झाल्‍या; पण आम्‍ही निराश नाही. मुळात पक्ष आणि कार्यकर्ते जाग्यावरच आहेत. आताही निवडणूक झाली तरी जनता कुणासोबत आहे, हे तुम्‍हाला कळेल; पण दिल्‍लीतील नेत्‍यांमध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नव्हती. आता पक्ष आणि चिन्ह त्‍या गटाला मिळाले म्‍हणजे निवडणूक जिंकता येईल हा दिल्‍लीश्‍वरांचा भ्रम आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता कुंपणावर असलेले काहीजण उड्या देखील मारतील; पण जनता तुमच्यासोबत कधीच नसेल. आज शिंदे गटात गेलेला एकही आमदार आणि खासदार पुढीलवेळेस कुठल्‍याच सभागृहात दिसणार नाही.’’

मराठी जनांनी विचार करून कृती करावी
ते म्‍हणाले, ‘‘निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्‍यात काही शिवसेना शाखांमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते घुसले होते. त्‍यांना तेथील शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला; मात्र असे प्रकार वारंवार व्हावेत. मराठी माणसांमध्ये भांडणं लागावीत. या भांडणात मराठी माणसांची डोकी फुटावीत, असाच खेळ दिल्‍लीवरून खेळला जात आहे. त्‍यामुळे मराठी माणसांनी विचार करूनच कृती करायला हवी.’’

कारस्थान आधीच रचलेले...
पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळणार, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता; परंतु पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायचे, असे कारस्थान आधीच रचण्यात आले होते. आम्‍हालाही त्‍याची माहिती होती. त्‍यामुळे राणे करत असलेल्‍या दाव्याला काहीच अर्थ नाही. आमदार, खासदार विकत घेऊन शिवसेना तुम्‍ही संपवू शकत नाही. खरी शिवसेना आमच्यासोबतच आहे, असे श्री. राऊत म्‍हणाले.