
रत्नागिरी-क्राईम
rat१८११. txt
(पान ३ साठी)
अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक
रत्नागिरी ः शहरानजीक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अंमलीसदृश पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवीण प्रकाश परब (वय ३७, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), ओंकार जगदीश बोरकर (वय २६, रा. चिंचखरी, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार गुरुवारी (ता. १६) रात्री पावणेआठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रिक्षामध्ये ५५ हजार रुपयांच्या आठ प्लास्टिकच्या पुड्या, त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या तीन प्लास्टिक पुड्या, तपकिरी पांढऱ्या रंगाच्या ५ प्लास्टिक पुड्या असून त्यामध्ये अंमलीसदृश पदार्थ आढळून आले. १ लाख ५५ हजार रुपयाची रिक्षा, ५ व ७ हजार रुपयांचे मोबाईल असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसनाईक मनोज लिंगायत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला व अटक केली. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
--
हरवलेल्या चावीच्या आधारे मोबाईलची चोरी
खेड ः हरवलेल्या रूमच्या चावीचा अज्ञात चोरट्याने फायदा उठवून घरातील सुमारे २० हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ फेब्रुवारीला आवाशीफाटा येथील गोळेचाळ येथे उघड झाली. या प्रकरणी आकाश कोदाई यादव (२२, मूळ गाव कल्याण, बदलापूर. सध्या रा. आवाशी गोळेचाळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. यादव याच्या भाड्याने राहत असलेल्या रूमची चावी हरवली होती. याचा फायदा अज्ञात चोरट्याने उठवून त्यास मिळालेल्या चावीने घरफोडी करत २० हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.