राजापूर ः निधी तुटवड्यामुळे गाळ उपशात खो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः निधी तुटवड्यामुळे गाळ उपशात खो
राजापूर ः निधी तुटवड्यामुळे गाळ उपशात खो

राजापूर ः निधी तुटवड्यामुळे गाळ उपशात खो

sakal_logo
By

निधीच्या तुटवड्यामुळे गाळ उपशात खो

कोदवली, अर्जुना नदी; आणखी किमान ५ डंपर्स हवेत

राजापूर, ता. १९ ः नगरपालिका आणि महसूल विभागाच्या जोडीला शहरातील इमेन्स तसेच नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून व लोकसहभागातून राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना नदी तसेच ब्रिटिशकालिन कोदवली धरणातील गाळ उपशाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. साधारणपणे जलसंपदा विभागामार्फत महिनाभर तसेच नाम फाउंडेशनच्यावतीने २० ते २५ दिवसांपेक्षा अधिक काळ हे काम सुरू आहे; मात्र लोकसहभागातून डिझेल खर्चासाठी गोळा केलेला निधी संपुष्टात आल्याने हे काम थंडावण्याची शक्यता दिसू लागली आहे.
कोदवली नदीपेक्षा अर्जुनेचे पात्र अधिक मोठे असल्याने अर्जुनेतील गाळ काढण्यासाठी तसेच कोदवली नदीपात्रातील काढण्यात आलेला गाळ वाहून नेण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची गरज असल्याने जिल्हा नियोजन मंडळाकडून अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी राजापूरवासीयांनी केली आहे.
यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी नियोजन मंडळाकडून मंजूर केलेल्या २५ लाख रुपयांच्या गाळ उपशाचे काम जलसंपदा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे; मात्र जलसंपदा विभागाने गाळ वाहून नेण्यासाठी किमान ५ डंपर्स पुरवावेत,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गाळ काढण्यापेक्षा अधिक खर्च हा गाळ वाहून नेण्यासाठी होत असल्याने लोकसहभागातून जमा झालेला आर्थिक निधी हा त्यापोटी डिझेलकरिता होत आहे. कोदवली नदीपात्रातील उपसलेला गाळ वाहून नेला नाही तर तोच गाळ पुन्हा नदीपात्रात येऊन हे अभियानच कोलमडण्याची शक्यता आहे. राजापूरकर नागरिकांनीदेखील या गाळ निर्मुलन अभियानासाठी अधिकाधिक निधी गोळा करावा असे आवाहन गाळ निर्मुलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. गाळ उपसा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव तसेच मुख्याधिकारी प्रशांत भोसले व जलनाम फाउडेशनचे पदाधिकारी समीर जानवलकर तसेच सहकारी प्रयत्नशील आहेत.

शासनाने मदत द्यावी
या अभियानात सध्या नागरिकांचा सहभाग थंडा दिसत असल्याने अनेक वर्षाने आखण्यात आलेले हे अभियान बारगळू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, शासनानेदेखील या अभियानाच्या मध्यावर आर्थिक मदतीचा हात द्यावा यासाठी पालकमंत्री सामंत यांना साकडे घालण्यात आले आहे.